नवीन वास्तूत केवळ नगरसेवकांच्या ६० वाहनांचीच क्षमता
नगरसेवकांची वाहने पार्क करण्याची समस्या राहणार कायमच
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील सभागृहाची आसन क्षमता कमी पडत असल्याने समोरील जिम खान्याच्या जागेवर नव्याने वास्तू उभारुन त्यांमध्ये तब्बल ३२९ नगरसेवक आसन क्षमतेचे सभागृह उभारले जाणार आहे. विशेष म्हणजे ही वास्तू आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याबाबतचा सुधारीत आराखड्याचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यता मिळाल्याने लवकरच स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. यामध्ये तळघरात आणि पोडियमवर केवळ ६० वाहने उभी राहू शकतील एवढी क्षमता असणार आहे. एका बाजुला सध्या महापालिका मुख्यालयाच्या जागेवर नगरसेवकांना आपली वाहने उभी करण्यास जागा नाही, त्यातच नव्याने उभारण्यात येणाऱ्या वास्तूत केवळ ६० वाहन क्षमता असलेले वाहनतळ उभारण्यात येत असल्याने नगरसेवकांसमोर वाहने उभी करण्याची समस्या नवीन सभागृह बांधल्यानंतरही कायम राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
पुरातन वारसा जतन परिसराचे महत्व लक्षात घेऊन आणि आजुबाजुच्या वारसा वास्तूंशी सुसंगत राहण्यासाठी सुमारे २८ मीटर उंचीची इमारत बांधकाम केले जाणार होते. बेसमेंट एक, बेसमेंट दोन अधिक तळमजला आणि वरचे चार मजले अधिक पाचव्या मजल्याचा अंशत: भाग यामध्ये रेस्टॉरंट कॅफे, व्ह्युईंग गॅलरी आणि टेरेस मजल्यावरील क काचेचे घुमट, कॅप्सुल लिफ्ट, कार लिफ्ट, तळमजल्यावर पार्किंग इत्यादीचा समावेश या टाऊन जिमखान्याच्या बांधकामांचा प्रस्ताव प्रशासनाच्यावतीने बनवण्यात आला होता. यासाठी निव्वळ खर्च २९ कोटी रुपये आणि विविध करांसह ३६ कोटी रुपये होता. यासाठी ठक्कर असोशिएट्सची नेमणूक करण्यात आली होती.
त्रिशूर : मध्य केरळमधील त्रिशूर (Keral, Thrissur) जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH-66) वर शुक्रवारी रात्री उशिरा एक अत्यंत भीषण अपघात घडला. महामार्गावर ...
परंतु या जिमखान्याचे नुतनीकरण करुन उभारण्यात येणाऱ्या वास्तूत सध्या आसन क्षमता कमी पडत असल्याने नवीन महापालिका सभागृह या वास्तूत बांधण्याची सूचना सभागृहनेते गणेश खणकर यांनी केली. त्यामुळे आता पूर्वीच्या आराखडा बदलून नव्याने आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार तळघरमध्ये वाहनतळ, तळमजला, दोन पोडियम तसेच तिसऱ्या मजल्यावर जिमखाना, चौथ्या मजल्यावर कार्यालये आणि पाचव्या व सहा मजल्यांवर महापालिका सभागृह बनवण्यात येणार आहे.
एकूण ९०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर ही सहा मजली इमारत बांधली जाणार आहे. या वास्तूत महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, सभागृहनेते आदींसह इतरांची कार्यालये असतील. याचा सुधारीत आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यासाठी यापूर्वी नेमलेल्या कंत्राटदाराकडूनच काम करून घेतले जाणार आहे. त्यामुळे सुधारीत आराखड्यात सभागृहाचे काम समाविष्ठ केल्याने तसेच इतर कामे समाविष्ठ केल्याने निश्चित केलेल्या कंत्राट किंमतीत १० ते १२ टक्के खर्च वाढला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढीव खर्चाचा प्रस्ताव नंतर सादर करून याबाबचा सुधारीत प्रस्ताव आयुक्तांच्या मंजुरीनंतर स्थायी समितीच्या मंजुरीसाठी पाठवला जाईल असे नगर अभियंता विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात येत आहे. यामध्ये नगरसेवकांच्या वाहनतळाची केवळ ६० वाहनांची क्षमता असून महापालिकेत २२७ अधिक १० नगरसेवक अशाप्रकारे २३७ नगरसेवक असून त्यांच्यासाठी किमान २००हून अधिक वाहनांकरता वाहनतळाची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रशासनाला नवीन वास्तूतही वाहनतळाची सुविधा देता न आल्याने नगरसेवकांची वाहने उभी करण्याची समस्या कायम राहणार आहे. सध्या वाहने उभी करण्यास जागा नसल्याने अनेक नगरसेवक आपली वाहने रस्त्यावर उभी करतात आणि त्यावर वाहतूक पोलिस हे फोटो ई चलन फाडत असतात. त्यामुळे भविष्यातही ही समस्या कायमच राहण्याची शक्यता आहे.