Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता आणि ‘गुलीगत किंग’ म्हणून लोकप्रिय झालेला सूरज चव्हाणच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सूरज चव्हाण बाबा झाला असून, त्याच्या घरी चिमुकल्या लेकीचं आगमन झालं आहे. ४ सप्टेंबर रोजी सूरजच्या पत्नी संजना हीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. विशेष म्हणजे, जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर लेकीचं आगमन झाल्याने सूरज आणि त्याच्या कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
आमच्या घरी राधा आलीये…
सूरज बाबा होणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर (Social Media) समोर आली होती. सूरजची मानलेली बहीण आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने (Janhvi Killekar) संजनाची चोरओटी भरतानाचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर संजनाचं डोहाळेजेवणही मोठ्या थाटामाटात पार पडलं. आता चिमुकलीच्या जन्मानंतर संजनाने आनंद व्यक्त करत 'आमच्या घरी राधा आलीये' अशी प्रतिक्रिया दिल्याची माहिती समोर आली आहे.
लेकीला पाहताच सूरजचा आनंद गगनात मावेना
चिमुकल्या लेकीला पाहिल्यानंतर सूरजचा आनंद गगनात मावत नसल्याचं पाहायला मिळालं. रुग्णालयातील व्हिडीओमध्ये सूरज आपल्या पत्नी संजनाजवळ जाऊन तिची प्रेमाने विचारपूस करताना दिसत आहे. सूरज आणि संजनाचा हा खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांकडूनही या नव्या आई-बाबांवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, जन्माष्टमीच्या दिवशी चिमुकलीचं आगमन झाल्यामुळे आता तिचं नाव काय ठेवलं जाणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. अनेक चाहत्यांनी सूरजला आपल्या लेकीचं नाव ‘राधा’ ठेवण्याचा सल्लाही दिला आहे.
लग्नानंतर वर्षभरातच घरात पाळणा हलला
सूरज आणि संजना यांचा विवाहसोहळा २९ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. सूरजच्या पत्नीचं पूर्ण नाव संजना गोफणे असून, ती सूरजच्या चुलत मामांची मुलगी आहे. दोघांचं लव्ह मॅरेज झाल्याचं सांगितलं जातं. बारामतीमध्ये झालेल्या या विवाहसोहळ्याला सूरजच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. अभिनेत्री जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील यांच्यासह काही राजकीय मान्यवर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सही या लग्नसोहळ्याला उपस्थित होते.
आता लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच सूरजच्या घरी चिमुकल्या लेकीचं आगमन झाल्याने ‘गुलीगत किंग’च्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.






