माथेरान : थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथेरानमधून एक अत्यंत सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. अंबरनाथ येथून मित्रासोबत पर्यटनासाठी आलेल्या एका २१ वर्षीय तरुणाने अलेक्झांडर पॉईंटवरून थेट १५०० फूट खोल दरीत उडी घेतली. या घटनेनंतर पोलीस आणि सह्याद्री रेस्क्यू टीमने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तब्बल आठ तासांचे बचावकार्य राबवून तरुणाला दरीतून बाहेर काढले; मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
धुकं आणि अंधारात पार पडले थरारक रेस्क्यू ऑपरेशन
मिळालेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर रोजी अंबरनाथचा रहिवासी असलेला सोनू गौतम (वय २१) हा त्याचा मित्र नासीर खान याच्यासोबत माथेरान येथे फिरण्यासाठी आला होता. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास दोघेही अलेक्झांडर पॉईंट परिसरात फिरत असताना सोनूने अचानक खोल दरीत उडी घेतली. परिसरात दाट धुके असल्याने नासीरला काहीच स्पष्ट दिसत नव्हते. त्याने क्षणाचाही विलंब न करता माथेरान पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती दिली. प्रभारी पोलीस अधिकारी सरिता मुसळे यांनी तातडीने 'सह्याद्री रेस्क्यू टीम'ला पाचारण केले. डोंगरावर पसरलेली धुक्याची दुलई आणि काळाकुट्ट अंधार या आव्हानांवर मात करत रेस्क्यू टीमने १५०० फूट खोल दरीत उतरून या तरुणाचा शोध घेतला.
पुणे : पुण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह सुरू असतानाच ध्वनी प्रदूषणाविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बिबवेवाडी परिसरातील श्रीकृष्ण तरुण ...
उपचारादरम्यान सोडले प्राण, पोलीस तपास सुरू
दरीतून बाहेर काढले तेव्हा सोनूच्या डोक्याला, हाताला आणि शरीराला गंभीर दुखापती झाल्या होत्या. पोलीस आणि बचाव पथकाने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र दुखापत तीव्र असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी माथेरान पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बी. जे. रुग्णालयात शवविच्छेदन (Post-mortem) करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. तरुणाने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
माथेरान आणि परिसरातील डोंगररांगांमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. याआधीही लुईसा पॉईंटजवळ एका तरुणाचा दरीत मृतदेह आढळल्याची घटना घडली होती. याशिवाय पेब किल्ल्यासारख्या आव्हानात्मक ठिकाणी ट्रेकिंग करताना किंवा पॉईंट्सवर धोकादायक पद्धतीने सेल्फी व रील्स काढण्याच्या नादात पाय घसरून अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, माथेरान फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी धोकादायक कड्यांजवळ जाणे टाळावे आणि प्रशासनाने दिलेल्या सुरक्षा सूचनांचे कडक पालन करावे, असे आवाहन स्थानिक पोलिसांकडून करण्यात येत आहे.