Sunday, September 6, 2026

Panvel Dahi Handi : पनवेलमध्ये दहीहंडी उत्सवाला गालबोट; विजेचा धक्का बसून ७ जण जखमी

Panvel Dahi Handi : पनवेलमध्ये दहीहंडी उत्सवाला गालबोट; विजेचा धक्का बसून ७ जण जखमी

पनवेल : दहीहंडी उत्सवाच्या जल्लोषाला पनवेलमध्ये गालबोट लागले. शहरातील लाईन आळी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान विजेचा प्रवाह उतरल्याने सात जणांना विजेचा धक्का बसल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. जखमींमध्ये एका सात वर्षीय चिमुकलीचाही समावेश आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली. पनवेल शहरातील शिवसेना शाखेजवळील नवनाथ पंथीय आस्थानात पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून मानवी मनोरा न रचता सुमारे सहा ते सात फूट उंचीवर दहीहंडी फोडण्याची परंपरा असल्याचे वृत्त आहे. यंदाही मोठ्या उत्साहात हा उत्सव पार पडत असताना अचानक काही जणांना विजेचा धक्का बसला.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

या घटनेत एकूण सात जण जखमी झाले. त्यामध्ये एका सात वर्षीय मुलीचाही समावेश आहे. विजेचा धक्का बसल्यानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. काही जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले असून, काहींवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत विद्युत पुरवठा खंडित केला. यामुळे पुढील धोका टाळण्यात आला. पनवेल शहर पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेतली.

दरम्यान, विजेचा प्रवाह नेमका कशामुळे उतरला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या दुर्घटनेमागचे नेमके कारण काय, याचा तपास आणि पडताळणी होणे महत्त्वाचे आहे. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील ही घटना सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी ठरली आहे. उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या विद्युत सजावटी, वायरिंग आणि इतर विद्युत उपकरणांची योग्य तपासणी झाली आहे का, याकडे आता लक्ष लागले आहे.

सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही; मात्र सात जणांना विजेचा धक्का बसल्याने उत्सवाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >