भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता या नामकरणाच्या प्रस्तावाला विरोध
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : 'एम/पूर्व' विभागातील गोवंडी, प्रभाग क्र.१३६ मधील साहीनाका डम्पिंग रोड येथील उद्यानास 'टिपू सुलतान उद्यान' असे नामकरण करण्याचा प्रशासनाने नकार दिला आहे. लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिकांचा विरोध पाहता सदर उद्यानास 'टिपू सुलतान उद्यान' असे नाव दिल्यास वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात या उद्यानाला हे नाव देता येणार नाही असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
समाजवादी पक्षाच्या गोवंडी, प्रभाग क्रमांक १३६ मधील तत्कालीन नगरसेविका रुक्साना नाझिम सिद्दीकी यांनी जानेवारी २०२१ मध्ये 'एम/पूर्व' विभागातील गोवंडी, प्रभाग क्र. १३६ मधील साहीनाका डम्पिंग रोड येथील उद्यानास 'टिपू सुलतान उद्यान' असे नांव देण्याच्या मागणी बाजार व उद्यान समितीकडे केली होती. "आपण प्रतिनिधीत्व करीत असलेल्या साहीनाका डम्पिंग रोड येथे उद्यान असून, सदर उद्यानाचे सुशोभिकरण व सौंदर्गीकरण करण्याचे काम चालू आहे. या उद्यानाचे 'टिपू सुलतान उद्यान' असे नामकरण करण्यात यावे अशी तेथील नागरिकांची तसेच माझीही आग्रहाची विनंती असल्याचे म्हटले होते.
पुणे : पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच सहकारनगर परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हातउसने घेतलेले पैसे परत ...
टिपू सुलतान हे भारताचे क्रांतीसेनानी होते. दक्षिण भारताच्या म्हैसूर प्रांताचे ते राजे होते. ते योग्य शासक, महान योध्दा व विद्वानपणा असे सर्व गुण त्यांच्यात होते. त्यांनी त्यांच्या काळात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरोधात युध्द पुकारले होते. भारताला इंग्रजापासून मुक्त करण्याचा त्यांनी पहिला प्रयत्न केला होता. त्यांच्या या महान कार्याबद्दलची माहिती चिरंतन रहावी म्हणून, 'एम/पूर्व' विभागातील गोवंडी, प्रभाग क्र.१३६ मधील साहीनाका डम्पिंग रोड येथील उद्यानास 'टिपू सुलतान उद्यान' असे नांव देण्याची मागणी सिद्दिकी यांनी केली होती.
यावर महापालिका आयुक्तांनी आपला अभिप्राय देताना, नामकरणासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या 'एम/पूर्व' विभागातील देवनार क्षेपणभूमीजवळ, शाही नाका, मौजे देवनार, गोवंडी, येथील न.भू.क्र.१ (भाग) धारण करणाऱ्या उद्यानाचे काम १५.०२.२०२२ रोजी पूर्ण करण्यात आले आहे.
लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिकांचा विरोध पाहता सदर उद्यानास 'टिपू सुलतान उद्यान' असे नाव दिल्यास वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ही कारणे विचारात घेता, 'एम/पूर्व' विभागातील देवनार क्षेपणभूमीजवळ, शाही नाका, मौजे देवनार, गोवंडी, येथील न.भू.क्र.१ (भाग) धारण करणाऱ्या उद्यानास 'टिपू सुलतान उद्यान' असे नाव देण्याची शिफारस करता येत नाही,असे नमूद केले आहे.
दरम्यान, माजी नगरसेविका रुक्साना सिद्दिकी यांनी याबाबत बोलताना प्रशासनाचा जो निर्णय असेल तो. मान्य आहे. त्यामुळे मी नावाचा आग्रह धरणार नसून या उद्यानाला दुसरे नाव दिले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.