Tuesday, September 8, 2026

Bandkhor Movie : ६ जणींचं आयुष्य बदलणारं ते एक बंड! ‘बंडखोर’ चित्रपटाची कथा नेमकी काय? ट्रेलरही भलताच चर्चेत

Bandkhor Movie : ६ जणींचं आयुष्य बदलणारं ते एक बंड! ‘बंडखोर’ चित्रपटाची कथा नेमकी काय? ट्रेलरही भलताच चर्चेत

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत ‘बाईपण भारी देवा’नं सहा बहिणींच्या भावनिक नात्याची गोष्ट सांगत प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर ९० कोटींहून अधिक कमाई करत सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीत तिसरं स्थान मिळवलं. आता पुन्हा एकदा सहा स्त्रियांची कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे; मात्र यावेळी विषय आहे त्यांच्या संघर्षाचा, निर्णयांचा आणि स्वतःच्या हक्कासाठी उभं राहण्याचा. (Bandkhor Movie)

कुटुंब, नाती, समाज आणि परिस्थिती यांप्रमाणेच अनेकदा स्त्रीच्या आयुष्याचे निर्णय घेतात. पण जेव्हा ती या चौकटी झुगारून देत स्वतःच्या आयुष्याची दिशा स्वतः ठरवण्याचा निर्णय घेते, तेव्हा तिच्या बंडाची सुरुवात होते. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘बंडखोर’ या सिनेमातून अशाच सहा स्त्रियांच्या आयुष्यातील वेगवेगळे संघर्ष आणि निर्णायक प्रसंग उलगडणार आहेत. नुकताच सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, त्यातून या सहा जणींच्या आयुष्यातील बंडखोर प्रवासाची झलक पाहायला मिळते. (Bandkhor Movie)

prahaar.in/2026/09/08/nashik-grand-replica-of-shri-tryambakraja-to-be-created-in-trimbakeshwar/

ट्रेलरमध्ये छाया कदम, प्रियदर्शनी इंदलकर, मृणाल कुलकर्णी, पूजा कातुर्डे, तितिक्षा तावडे आणि नित्यश्री ज्ञानलक्ष्मी साकारत असलेल्या सहाही व्यक्तिरेखांची अधिक स्पष्ट ओळख होते. या सहा जणींची आयुष्यं वेगवेगळी असली तरी त्यांच्या वाटेला आलेली परिस्थिती त्यांना एका समान बिंदूवर आणून उभी करते. आपल्यावर लादलेलं आयुष्य जगण्यापेक्षा स्वतःच्या अस्तित्वासाठी प्रश्न विचारण्याची आणि त्याची उत्तरं शोधण्याची वेळ त्यांच्यावर येते. त्यामुळे या सहा जणींचं 'बंडखोर' होणं ही केवळ एका क्षणाची प्रतिक्रिया नसून, त्यामागे दडलेल्या अनेक भावनांची आणि अनुभवांची गोष्ट आहे. (Bandkhor Movie)

ट्रेलरमधील संवाद, प्रसंग आणि व्यक्तिरेखांमधील नातेसंबंध या कथेला अधिक प्रभावी बनवत आहेत. सहा स्त्रिया नेमक्या कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, त्यांच्या आयुष्यातील कोणत्या घटना त्यांना निर्णय घेण्यास भाग पाडतात आणि त्या निर्णयांची किंमत त्यांना काय मोजावी लागते, याची उत्सुकता ट्रेलर निर्माण करतो. विशेष म्हणजे या सहाही व्यक्तिरेखा एकमेकींपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असूनही त्यांच्या संघर्षाचा सूर एकच आहे, तो म्हणजे स्वतःसाठी उभं राहाण्याचा.

सिनेमाविषयी बोलताना दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले, 'बंडखोर' हा शब्द आपण अनेकदा नकारात्मक अर्थाने वापरतो, परंतु माझ्यासाठी बंडखोर म्हणजे अन्यायाविरोधात आवाज उठवणारी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी ठामपणे उभी राहाणारी स्त्री. म्हणूनच सुनेत्रा अजित पवार यांना या चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळ्यानिमित्त आवर्जून बोलावलं. त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीला त्या ज्या खंबीरपणे सामोरं गेल्या आहेत. त्यातून त्यांच्यातली बंडखोर वृत्ती दिसते.

"माझी मोठी मुलगी खऱ्या अर्थाने बंडखोर आहे आणि तिच्यामुळेच या चित्रपटाची कल्पना सुचली. माझ्या आयुष्यात माझी आई, माझ्या पत्नी आणि मुली यांनी मला घडवलं आहे. मी आज जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे. वेगवेगळ्या स्त्रियांच्या आयुष्यात पाहिलेल्या संघर्षातून 'बंडखोर'ची कथा आकाराला आली. हा चित्रपट मला घडवणाऱ्या आणि मला प्रेरणा देणाऱ्या प्रत्येक स्त्रीला वाहिलेली आदरांजली आहे." (Bandkhor Movie)

'बंडखोर' हा सहा स्त्रियांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या संघर्षांची आणि स्वतःसाठी घेतलेल्या निर्णयांची गोष्ट येत्या २४ सप्टेंबरला प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. (Bandkhor Movie)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >