Tuesday, September 8, 2026

सॉफ्टवेअर सोर्स कोड चोरीप्रकरणी मोठी कारवाई! दुबईत पसार झालेला संशयित पुणे विमानतळावर अटकेत

सॉफ्टवेअर सोर्स कोड चोरीप्रकरणी मोठी कारवाई! दुबईत पसार झालेला संशयित पुणे विमानतळावर अटकेत

Action taken in software source code theft case : पुण्यातील आयटी कंपनीच्या सॉफ्टवेअरचा सोर्स कोड चोरी केल्याच्या प्रकरणात अहिल्यानगर सायबर पोलिसांनी (Ahilyanagar Cyber ​​Police) मोठी कारवाई केली आहे. प्रकरणातील संशयित आरोपी मंदार प्रदीप पाथरीकर, याला दुबईतून परतल्यानंतर पुणे विमानतळावर अटक करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो दुबईला पसार झाला होता. त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. दुबईहून पुणे विमानतळावर दाखल होताच सायबर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली.

१५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

अटकेनंतर मंदार पाथरीकरला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईची माहिती सायबर पोलीस निरीक्षक तथा तपासी अधिकारी सागर ढिकले यांनी दिली. या प्रकरणात पुण्यातील नितीन गोपालदास भराडीया यांनी मार्च २०२६ मध्ये अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या आधारे दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले. त्यापैकी एका गुन्ह्यात मंदार पाथरीकरला अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी भराडीया हे पीआरएम सॉफ्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत प्रमुख धोरण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ही कंपनी २०१३ पासून महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांसाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्याचं काम करते. वित्तीय व्यवस्थापन, DBT-SNA प्रणाली, PFMS इंटिग्रेशनसह विविध वेब आणि मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स कंपनीने विकसित केले आहेत.

‘एकात्मिक एकल पोर्टल’चा सोर्स कोड चोरीचा आरोप

ग्रामविकास विभागासाठी कंपनीने बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने २०२४ मध्ये ‘एकात्मिक एकल पोर्टल’ अर्थात SUP ही संगणकीय प्रणाली विकसित केली होती. ही प्रणाली १ एप्रिल २०२५ पासून कार्यान्वित करण्यात आली. मात्र कंपनीच्या कामाचे देयक प्रलंबित राहणं आणि करार पूर्ण करण्यास झालेला विलंब यामुळे एप्रिल २०२५ मध्ये कंपनीने ही सेवा बंद केली. यानंतर बँकेकडून या प्रणालीचा सोर्स कोड मागण्यात आला. मात्र, त्यासाठी कोणताही औपचारिक करार नसल्याचं सांगत कंपनीने सोर्स कोड देण्यास नकार दिला.

व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये झाला संशय

यानंतर ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बँकेकडून सादर करण्यात आलेली प्रणाली कंपनीने विकसित केलेल्या SUP प्रणालीसारखीच असल्याचं कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं. यानंतर कंपनीने अंतर्गत तपास सुरू केला. या तपासात काही माजी कर्मचाऱ्यांनी कंपनीचा गोपनीय डेटा अनधिकृतपणे क्लाउड प्लॅटफॉर्म, ई-मेल आणि बाह्य हार्डडिस्कच्या माध्यमातून हस्तांतरित केल्याचं समोर आलं.

सोर्स कोड कंपनीबाहेर पाठवल्याचा आरोप

तपासात विविध डिजिटल माध्यमांचा वापर करून सॉफ्टवेअरचा सोर्स कोड कंपनीबाहेर पाठवण्यात आल्याचंही समोर आलं. यानंतर अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आता या प्रकरणातील संशयित मंदार पाथरीकरला दुबईतून परतताच अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून सोर्स कोड चोरीप्रकरणात आणखी काय माहिती समोर येते, याकडे पोलिसांचं लक्ष आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >