Tuesday, September 8, 2026

Nashik : त्र्यंबकेश्वरमध्ये साकारणार ‘श्री त्र्यंबकराजा’ची भव्य प्रतिकृती ! गौतमी गोदावरी धरणातील बेटावर १७ कोटींचा विकास

Nashik : त्र्यंबकेश्वरमध्ये साकारणार ‘श्री त्र्यंबकराजा’ची भव्य प्रतिकृती ! गौतमी गोदावरी धरणातील बेटावर १७ कोटींचा विकास

Simhastha Mahakumbh Mela 2027 : सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरातील पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. गौतमी गोदावरी धरणातील बेटावर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकराजाची भव्य प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. या प्रतिकृतीसह परिसराचा विकास आणि विद्युत सुविधांसाठी तब्बल १७ कोटी ३४ लाख ९० हजार रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

प्रतिकृतीसाठी जवळपास १० कोटींचा खर्च

नाशिक पाटबंधारे विभागाच्या प्रस्तावानुसार या संपूर्ण प्रकल्पासाठी तीन प्रमुख कामं केली जाणार आहेत. श्री त्र्यंबकराजाची प्रतिकृती उभारण्यासाठी तब्बल ९ कोटी ९८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. तर प्रतिकृतीच्या सभोवतालच्या परिसराच्या विकासासाठी ५ कोटी ४१ लाख रुपये, आणि विद्युत सुविधांसाठी १ कोटी ९४ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामाची निविदाही प्रसिद्ध झाली असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

कुंभमेळ्यामुळे भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित

सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरमध्ये देशभरातूनच नाही तर परदेशातूनही मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर परिसरातील पर्यटन सुविधांचा विकास करण्यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे. श्री त्र्यंबकराजाची प्रतिकृती उभारल्यामुळे त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक आणि पर्यटन महत्त्वात आणखी भर पडणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

पर्यटनासोबत स्थानिक रोजगारालाही चालना

या प्रकल्पामुळे केवळ धार्मिक पर्यटन वाढणार नाही, तर स्थानिक व्यवसायांनाही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. भाविक आणि पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा, परिसर विकास आणि विद्युत व्यवस्था उपलब्ध झाल्यानंतर पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. याचा थेट फायदा हॉटेल व्यवसाय, वाहतूक, स्थानिक बाजारपेठ आणि इतर पूरक व्यवसायांना होऊ शकतो. तसंच स्थानिक पातळीवर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

सिंहस्थपूर्वी विकासकामांना वेग

या प्रकल्पासाठी राज्याचे जलसंपदा तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे मार्गदर्शन लाभल्याचं जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांनी सांगितलं आहे. सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने भाविक, पर्यटक आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध विकासकामांचं नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे गौतमी गोदावरी धरणातील बेटावर साकारणारी श्री त्र्यंबकराजाची भव्य प्रतिकृती हे त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक पर्यटनाचं आणखी एक आकर्षण ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >