मुंबई : मुंबईत गणेशमूर्तीच्या अपघाताची आणखी एक घटना समोर आली आहे. कुर्ला पश्चिमेकडील शीतल तलाव परिसरात धारावीच्या प्रेम नगरचा महाराजा या गणेशमूर्तीची ट्रॉली स्पीड ब्रेकरवरून जात असताना तिचा तोल गेला. या घटनेत मंडळाचे दोन कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर मूर्तीचे नुकसान झाल्याने तिचे जवळील छत्रपती शिवाजी महाराज तलावात विसर्जन करण्यात आले. ( Mumbai Ganeshotsav)
मुंबई: ऑगस्ट महिन्यानंतर सप्टेंबरमध्येही महाराष्ट्रात पावसाची कमतरता जाणवत आहे. सध्या राज्यात मोठ्या पावसासाठी अनुकूल अशी ठोस हवामान प्रणाली ...
नेमकं काय घडलं ?
धारावीतील ओम शक्ती वेलफेयर फाऊंडेशनच्या प्रेम नगरचा महाराजाचे 8 ऑगस्ट रोजी आगमन होणार होते. त्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते सुमारे 15 फूट उंचीची गणेशमूर्ती कुर्ला बैलबाजार परिसरातून घेऊन निघाले होते. ही मूर्ती एलबीएस मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज तलावाच्या दिशेने जात असताना रस्त्यावरील गतिरोधकावरून ट्रॉलीचा तोल गेला आणि अपघात झाला.(Kurla Accident)
घटनेत दोघे जण जखमी
या दुर्घटनेत संतोष जैस्वार आणि रोहित जैस्वार हे दोन कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने जवळील भाभा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचारानंतर दोघांनाही घरी सोडण्यात आले. दरम्यान, मूर्तीचे नुकसान झाल्याने तिचे जवळील छत्रपती शिवाजी महाराज तलावात विसर्जन करण्यात आले.
भुलेश्वरच्या राजाच्या मिरवणूकीत मोठी दुर्घटना
याआधी 22 ऑगस्ट रोजी दक्षिण मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या मिरवणुकीदरम्यानही मोठी दुर्घटना घडली होती. भायखळ्याहून भुलेश्वरच्या दिशेने जात असताना मंडपापासून काही अंतरावर गणेशमूर्तीचा तोल गेला होता. या घटनेत संकेत नेवशे आणि ब्रिजेश हेमंत जोशी या दोन जणांचा मृत्यू झाला, तर 5 जण जखमी झाले होते. जखमींमध्ये 5 आणि 7 वर्षांच्या दोन मुलींचाही समावेश होता. ( Bhuleshwarcha Raja)
भुलेश्वरच्या राजाच्या दुर्घटनेनंतर मुंबईकरांमध्ये हळहळ व्यक्त होत असतानाच कुर्ल्यात गणेशमूर्तीला झालेल्या अपघाताची घटना समोर आली आहे. त्यामुळे मोठ्या गणेशमूर्तींच्या वाहतुकीदरम्यान सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.