Ujjain : एकीकडे २०२८ च्या सिंहस्थ महाकुंभाची जोरदार तयारी, रस्ता रुंदीकरणासाठी मंदिर हटवण्याचं काम सुरू पण मंदिरातील हनुमानाची मूर्ती हलवण्याची वेळ आली आणि प्रशासनासमोरच मोठा पेच निर्माण झाला. उज्जैनमधील प्रसिद्ध खडे हनुमान मंदिराची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. कंठाल चौक ते छत्री चौक या मार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे. याच मार्गावर सती गेटजवळ खडे हनुमानाचं हे मंदिर आहे. मंदिर तब्बल १७० वर्षांहून अधिक जुनं असल्याचं सांगितलं जातं. मंदिरातील जवळपास ८ फूट उंच हनुमानाची उभी मूर्ती हे या मंदिराचं प्रमुख वैशिष्ट्य आहे.
मंदिर हटवलं, पण मूर्ती जागची जागी
रस्ता रुंदीकरणासाठी ४ आणि ५ सप्टेंबर रोजी महानगरपालिकेच्या पथकाने मंदिराची वास्तू हटवण्यास सुरुवात केली. मात्र त्यानंतर खरी अडचण समोर आली. हनुमानाची मूर्ती अन्यत्र हलवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. हायड्रॉलिक यंत्रसामग्री आणि इतर तांत्रिक पद्धतींचा वापर करण्यात आला. पण चार दिवसांत चार प्रयत्न करूनही मूर्ती इंचभरही हलली नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे प्रशासन आणि अभियंत्यांसमोर आता मोठा प्रश्न उभा राहिला आहे मूर्ती हलवायची कशी?
मूर्ती हलत नसल्याची बातमी परिसरात पसरताच मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येऊ लागले आहेत. काही भाविक या घटनेकडे श्रद्धेच्या दृष्टीने पाहत असून, ‘हनुमानाची स्वतःची जागा सोडण्याची इच्छा नाही,’ अशी भावना व्यक्त केली जात आहे. मात्र या घटनेमागे धार्मिक श्रद्धेपलीकडे नेमकं तांत्रिक कारण काय आहे, याचा शोध घेणं प्रशासनासाठी महत्त्वाचं ठरणार आहे.
- मंत्रिमंडळाची मंजुरी; मुंबईतील कैवल्यधाम सेंटरच्या भाडेपट्ट्याचेही सवलतीच्या दराने नूतनीकरण मुंबई : कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा ...
मूर्ती १७० वर्षांची की हजार वर्षांची ?
दरम्यान, या मूर्तीच्या ऐतिहासिक अस्तित्वाबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार मंदिराची स्थापना १८५७ च्या आसपास झाल्याचा दावा केला जातो. त्यामुळे मंदिराचा इतिहास साधारण १७० वर्षांहून अधिक जुना मानला जातो. मात्र काही पुरातत्त्व तज्ज्ञांनी मूर्तीच्या शिल्पशैलीचा संबंध परमार राजवंश किंवा राजा भोज यांच्या काळाशी असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जर हा दावा पुरातत्त्वीय तपासणीत सिद्ध झाला, तर मूर्तीचं वय १७० वर्षांपेक्षा खूपच अधिक असण्याची शक्यता आहे. मात्र मूर्ती तब्बल १००० वर्षे जुनी असल्याचा दावा अद्याप अधिकृतरीत्या सिद्ध झालेला नाही.
आता ASI च्या तपासाकडे लक्ष
या संपूर्ण प्रकरणात आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अर्थात ASI विभागाने लक्ष घातलं आहे. मूर्तीचा नेमका इतिहास काय? ती कोणत्या दगडापासून बनवण्यात आली आहे? तिचा पाया जमिनीत किती खोल आहे? आणि ती नेमकी किती जुनी आहे? या प्रश्नांची उत्तरं पुरातत्त्वीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहेत. सध्या मंदिराची वास्तू हटवल्यानंतर मूर्ती तिच्या मूळ जागेवरच सुरक्षित ठेवण्यात आली आहे. तिच्या संरक्षणासाठी तात्पुरता मंडप उभारण्यात आला आहे. एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ता रुंदीकरणाचं काम आणि दुसरीकडे शेकडो वर्षांचा धार्मिक-ऐतिहासिक वारसा जपण्याचं आव्हान त्यामुळे उज्जैनच्या खडे हनुमान मंदिरासमोर आता प्रशासन कोणता निर्णय घेतं, याकडे भाविकांसह इतिहासप्रेमींचंही लक्ष लागलं आहे.






