Nashik : विकासाची गती कायम ठेवतानाच पर्यावरणाचे संवर्धन करून भावी पिढ्यांसाठी हरित, स्वच्छ व शाश्वत नाशिक घडविणे, हाच ‘इको संकल्पा’चा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन (Guardian Minister Girish Mahajan) यांनी केले. नाशिकमध्ये एकाच दिवशी १२० शाळांतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ४० हजार पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली.
पर्यावरण संवर्धनातून हरित नाशिक घडवू
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कै. तुकाराम रौंदळ सभागृहात नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) वतीने आयोजित एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स नोंदणी सोहळा व ‘विकासगौरी इको बाप्पा २.०’ कार्यक्रमात महाजन बोलत होते. यावेळी मंत्री महाजन म्हणाले की, गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती व सामाजिक एकोप्याचा उत्सव असून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. ‘इको बाप्पा’च्या माध्यमातून श्रद्धेसोबत पर्यावरण संवर्धनाचा विचार रुजविण्याचा नाशिकचा प्रयत्न देशासाठी प्रेरणादायी ठरेल. वाढते प्रदूषण, बदलते हवामान व घटती हिरवळ लक्षात घेता वृक्षसंवर्धन, हरित क्षेत्रवाढ, स्वच्छता व जलसंधारणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. नागरिक, स्वयंसेवी संस्था व शैक्षणिक संस्थांनी सहभागी होऊन ‘इको संकल्प’ लोकचळवळ बनवावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच गणेशमूर्तींची विटंबना होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
Nashik : नाशिक हे सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे, त्यामुळे साहजिकच अनेक भाविक, पर्यटक याठिकाणी मोठ्या संख्येने भेटी देत असतात. अशाच प्रकारे ...
उपक्रमाची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
‘विकासगौरी इको बाप्पा २.०’ (Vikasgauri Eco Bappa 2.0) उपक्रमाची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये (Asia Book of Records) नोंद झाल्याबद्दल महापौर हिमगौरी आडके-आहेर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला, असे महापौर हिमगौरी आडके-आहेर म्हणाल्या.
यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार प्रा. देवयानी फरांदे, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्रदीप चौधरी, उपायुक्त संगिता नांदूरकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. पालकमंत्री गिरीश महाजन व मान्यवरांच्या हस्ते एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.





