मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) कामांसाठी राज्य सरकारने गुरुवारी १ हजार ८०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली. पावसाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या ३ हजार कोटी रुपयांच्या पूरक मागणीतील शिल्लक निधी प्राधिकरणाला उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यामुळे कुंभमेळ्याच्या नियोजन आणि अंमलबजावणीशी संबंधित कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.
सिंहस्थाच्या तयारीसाठी सरकारकडून यापूर्वीही टप्प्याटप्प्याने निधी देण्यात आला आहे. २०२५-२६मध्ये ऑक्टोबर २०२५मध्ये २८३ कोटी, डिसेंबरमध्ये ७१७ कोटी, फेब्रुवारी २०२६मध्ये ५०१.४० कोटी, मे २०२६मध्ये ३९६.६० कोटी आणि जुलै २०२६मध्ये १,२०० कोटी रुपये वितरित करण्यात आले. त्यानंतर २०२६-२७च्या पावसाळी अधिवेशनात कुंभमेळ्याच्या आवश्यक कामांसाठी ३ हजार कोटी रुपयांची पूरक मागणी मंजूर झाली. त्यातील १ हजार ८०० कोटी रुपयांचा निधी आता वितरित करण्यात येणार आहे.
ठाणे : ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्यात अभिनेता संजय दत्तने केलेल्या मराठी भाषेसंदर्भातील वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा ...
मात्र, या निधीच्या खर्चावर शासनाने काही अटी घातल्या आहेत. मंजूर उद्दिष्टांखालील कामांवरच निधी खर्च करावा लागणार असून, संबंधित कामांना सक्षम प्राधिकाऱ्यांची प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतरच निधी संबंधित यंत्रणांना वितरित अथवा खर्च करता येणार आहे. निधीचा विनियोग करताना अर्थ विभागाच्या मार्गदर्शक सूचना, प्रचलित निकष आणि वित्तीय अधिकारांचे प्रत्यायोजन यांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा नाशिक विभागीय आयुक्त यांच्यावर राहणार आहे.
निधी खर्च झाल्यानंतर त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र तातडीने शासनाला सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. निधी प्राधिकरणाच्या स्वीय प्रपंजी लेखा खात्यात (पीएलए) आहरित करून तेथून वितरित करण्यास तसेच आवश्यकतेनुसार संबंधित बँक खात्यात आहरित करून खर्च करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.