Thursday, September 10, 2026

Simhastha Mahakumbh Mela 2027: ‘सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धे’च्या नोंदणीला मुदतवाढ, आता 'या' तारखेपर्यंत करता येणार नोंदणी

Simhastha Mahakumbh Mela 2027: ‘सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धे’च्या नोंदणीला मुदतवाढ, आता 'या' तारखेपर्यंत करता येणार नोंदणी

Simhastha Mahakumbh Mela 2027 : ‘सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धे’त (‘Simhastha Mahakumbh’ Ganesh Mandal Competition) नाव नोंदवू इच्छिणाऱ्या मंडळांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण ‘सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धे’च्या नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आगामी सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७चा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरातील गणेश मंडळांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी १० सप्टेंबर २०२६पर्यंत असलेली नोंदणी आता १७ सप्टेंबर २०२६पर्यंत करता येणार आहे.

स्पर्धेमागचा हेतू काय ?

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सिंहस्थचा आध्यात्मिक, सांस्कृतिक, पर्यावरणपूरक आणि तंत्रज्ञानाधारित संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अधिकाधिक गणेश मंडळांना या उपक्रमात सहभागी होता यावे आणि त्यांच्या कल्पकतेला महासिंहस्थच्या जनजागृतीशी जोडता यावे, या उद्देशाने नोंदणीसाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. नाशिक शहर तसेच त्र्यंबकेश्वर परिसरातील गणेश मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून, मंडळांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर सिंहस्थविषयक जनजागृती, सामाजिक सहभाग आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.

खर्चाला टाळा

गणेशोत्सव म्हटलं की अनेक लोक खर्चिक मार्गांचा पर्याय अवलंबतात. पण हे सर्व टाळून उत्तम अशा कल्पनेला प्राधान्य दिले जाणार आहे म्हणजे स्पर्धेत मोठ्या किंवा खर्चिक सजावटीपेक्षा कल्पकता, सर्जनशीलता, नागरिकांचा सहभाग आणि शाश्वतता यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे लहान-मोठ्या सर्व गणेश मंडळांना सहभागी होऊन आपली संकल्पना मांडण्याची समान संधी मिळणार आहे. सिंहस्थच्या विषयाशी सुसंगतता, कल्पकता, अंमलबजावणीची गुणवत्ता, नागरिकांचा सहभाग व उपक्रमाचा परिणाम तसेच शाश्वतता या निकषांवर मंडळांचे मूल्यमापन केले जाणार आहे.

पाच श्रेणींमध्ये प्रत्येकी एक लाखांचे पारितोषिक

‘सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धे’त (‘Simhastha Mahakumbh’ Ganesh Mandal Competition) पाच प्रमुख श्रेणी असून प्रत्येक श्रेणीतील विजेत्या मंडळाला १ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

- कुंभ संकल्पनेवर आधारित सर्वोत्कृष्ट देखावा – ₹१ लाख

- सर्वोत्कृष्ट आध्यात्मिक देखावा – ₹१ लाख

- सर्वोत्कृष्ट पर्यावरणपूरक गणेश मंडळ – ₹१ लाख

- सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान व नाविन्य – ₹१ लाख

- सर्वोत्कृष्ट सामाजिक उपक्रम – ₹१ लाख

याशिवाय नावीन्यपूर्ण आणि विशेष संकल्पनेसाठी २ लाख रुपयांचा विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे.

सहा विषयांवर आधारित उपक्रम

गणेश मंडळांना सिंहस्थशी संबंधित सहा प्रमुख विषयांभोवती देखावे किंवा विविध जनजागृती उपक्रम राबविता येणार आहेत. यामध्ये महाकुंभमेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व, नाशिक-त्र्यंबकेश्वरचा वारसा, तंत्रज्ञान आणि कुंभ, हरित व शाश्वत कुंभ, कुंभ आणि आखाडे तसेच भाविकांची सेवा आणि समर्पण या विषयांचा समावेश आहे.

१७ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची संधी

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गणेश मंडळांना आता १७ सप्टेंबर २०२६पर्यंत नोंदणी करता येणार आहे. कुंभमेळा प्राधिकरणाच्या अधिकृत Instagram हँडल ‘ntkma2027’ वर उपलब्ध Google Form द्वारे नोंदणी करता येईल.

स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना, नोंदणी प्रक्रिया आणि पुढील घोषणा याच सोशल मीडिया हँडलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >