Friday, September 11, 2026

Crime News : महिनाभरानंतर घरी आला अन् पत्नीची हत्या केली, दोन चिमुकल्यांना घेऊन पती फरार

Crime News : महिनाभरानंतर घरी आला अन् पत्नीची हत्या केली, दोन चिमुकल्यांना घेऊन पती फरार

Agra Crime News : पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना आग्राच्या खंदौली पोलीस ठाणे (Khandauli Police Station) हद्दीतील पिलपोखर गावात घडलीय.तब्बल महिनाभर घरापासून दूर राहिलेला पती अचानक घरी परतला आणि त्यानंतर रात्री पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर इतक्या भयंकर घटनेत झाले की, पतीने आधी पत्नीच्या डोक्यात जड वस्तूने वार केला आणि त्यानंतर चाकूने तिची गळा चिरून हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर आरोपी आपल्या दोन लहान मुलांना सोबत घेऊन फरार झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

हुंड्यासाठी पत्नीचा छळ केल्याचा आरोप

पिलपोखर गावातील राजकुमार सिकरवार यांचा ३२ वर्षीय मुलगा विवेक सिकरवार याचे सुमारे आठ वर्षांपूर्वी एत्मादपूरमधील चली गावातील विजेंद्र सिंह यांची मुलगी किरण हिच्याशी लग्न झाले होते. किरणचे वय ३० वर्षे होते. या दाम्पत्याला लक्ष्य (५) आणि चुन्नू (३) अशी दोन मुले आहेत. किरणच्या माहेरच्या कुटुंबीयांच्या आरोपानुसार, लग्नानंतर सुरुवातीचा काळ सुरळीत गेला. मात्र, त्यानंतर विवेक आणि त्याच्या कुटुंबीयांकडून हुंड्याच्या मागणीवरून किरणचा छळ सुरू झाला. विवेक कोणताही रोजगार करत नसल्याने घरखर्च आणि हुंड्याच्या मागणीवरूनही तिला त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे.

पंचायती झाल्या, पण छळ थांबला नाही

किरणचा भाऊ ललित याने दिलेल्या माहितीनुसार, बहिणीचा संसार टिकावा यासाठी दोन्ही कुटुंबीय आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत अनेकदा पंचायती घेण्यात आल्या. प्रत्येक वेळी विवेकने समझोता केला. मात्र, घरी परतल्यानंतर पुन्हा किरणला मारहाण सुरू होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. विवेक गेल्या जवळपास महिनाभरापासून घरातून गायब होता. सोमवारी संध्याकाळी तो अचानक घरी परतला. त्यानंतर रात्री पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. याच वादातून विवेकने किरणच्या डोक्यात जड वस्तूने वार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर चाकूने गळा चिरून तिची हत्या केल्याचे पोलिसांना सांगण्यात आले आहे. हत्येनंतर विवेकने आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेतले आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घरातून पळ काढला. (Agra Crime News)

दरवाजा उघडला नाही, शेजाऱ्यांना संशय

मंगळवारी दुपारपर्यंत किरणच्या घराचा दरवाजा उघडला नाही आणि मुलेही बाहेर खेळायला दिसली नाहीत, तेव्हा शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून आत डोकावून पाहिले असता, किरणचा रक्ताने थारोळलेला मृतदेह जमिनीवर पडून असल्याचे दिसले. या भयानक दृश्यामुळे शेजाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ खंदौली पोलिसांना याची माहिती दिली.

फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वाडसह तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच खंदौली पोलीस ठाण्याचे निरीक्षक उपेंद्र श्रीवास्तव पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वाडच्या मदतीने घटनास्थळाची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी किरणचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. माहेरच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आरोपी पती विवेक सिकरवारविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत असून, त्याच्यासोबत असलेल्या दोन्ही लहान मुलांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >