Friday, September 11, 2026

Nashik Crime News : नाशिकमध्ये लेडी ब्लॅकमेलरची दहशत ! CA ला चाकूचा धाक दाखवत ५ लाखांची खंडणी मागितली अन्...

Nashik Crime News : नाशिकमध्ये लेडी ब्लॅकमेलरची दहशत ! CA ला चाकूचा धाक दाखवत ५ लाखांची खंडणी मागितली अन्...

Nashik Crime News : स्वतःचे पैसे परत मागणे एका ५६ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटला चांगलेच महागात पडल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. आर्थिक व्यवहारातून निर्माण झालेल्या वादानंतर सीएला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे एवढ्यावरच न थांबता, या महिलेने शहरातील सराईत गुन्हेगाराची मदत घेत सीएला चाकूचा धाक दाखवून पुन्हा ५ लाख रुपयांची मागणी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी छाया जयप्रकाश सेन (रा. पाथर्डी फाटा) आणि समीर पठाण यांच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस (Mumbai Naka Police Station) ठाण्यात खंडणीसह शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime News)

नेमकं प्रकरण काय ?

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, कालिका अपार्टमेंट परिसरातील रहिवासी सीए राजेश सत्यनारायण चांद यांच्याकडून छाया सेन हिने २०१९ पासून टप्प्याटप्प्याने तब्बल ९ लाख ९७ हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे.चांद यांनी आपली रक्कम परत मागण्यास सुरुवात केल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. पैसे परत करण्याऐवजी त्यांना दबावात आणण्यासाठी छाया सेन हिने सराईत गुन्हेगार समीर पठाण याची मदत घेतल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. समीर पठाण याने चांद यांना खोट्या तक्रारीत अडकवण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत एक लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. मात्र, या प्रकारानंतरही पैशांची मागणी थांबली नाही.

बुधवारी, ९ सप्टेंबर रोजी दुपारी, छाया सेन आणि समीर पठाण हे चांद यांच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी दोघांनी पुन्हा ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. मागणी पूर्ण केली नाही तर दुसऱ्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर आणखी एक लाख रुपये जबरदस्तीने घेतल्याचे चांद यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. (Nashik Crime News)

सराईत गुन्हेगाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा वापर ?

संशयित छाया सेन हिने आर्थिक फसवणुकीवर पडदा टाकण्यासाठी शहरात खून, दरोडे, जबरी चोरी आणि हद्दपारीचे आदेश मोडून फिरणाऱ्या समीर पठाण याच्या गुन्हेगारी नेटवर्कचा ढालसारखा वापर केल्याचे उघड झाले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मुंबई नाका पोलिसांनी दोघांविरुद्ध खंडणीसह शस्त्र कायद्यान्वये (आर्म्स अॅक्ट) गुन्हा नोंदवला असून, पोलीस निरीक्षक पंडित पवार पुढील तपास करत आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >