मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रूझ परिसरात राहणार्या दोन बहिणींची काही दिवसांपूर्वी टिंडर ॲपच्या माध्यमातून दोन अनोळखी तरूणांशी ओळख झाली. त्यांनी काही दिवस ऑनलाइन चॅटिंग केली. त्यानंतर तरूणांनी चॅटिंगमधून या दोन्हीही बहिणींचा विश्वास संपादन करून त्यांना नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात भेटायला बोलावले. त्या तरूणांनी या दोन्हीही बहिणींना भेटायला येण्यासाठी कोणताही त्रास होऊ नये म्हणून कॅब सुद्धा बुक करून दिली. या बहिणी सीवूड्सला आल्यानंतर परिसरातल्या एका मॉलमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांना फिरवले. फिरवत असताना त्या दोन्हीही तरूणांनी बहिणींना बळजबरीने बियर पाजली. बियर पाजल्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत गैरप्रकार देखील केला.
दोन्हीही बहिणी मद्यधुंद झाल्यानंतर त्या तरूणांनी विश्रांती घेण्याचा बहाणा करून त्यांना एका हॉटेल रूमवर नेले. हॉटेलमध्ये त्या मुली बेशुद्ध असताना आरोपींनी त्यांच्यावर मध्यरात्रीच्या सुमारास अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी घरी पोहोचल्यानंतर दोन्हीही बहिणींनी घडलेला प्रकार आई- वडिलांना सांगितला. तात्काळ पालकांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंद केली. पोलिसांनी दोन्हीही बहिणींची वैद्यकीय तपासणी पूर्ण केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा नवी मुंबईतील एनआरआय कोस्टल पोलीस तपास करत आहेत. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून हॉटेल आणि मॉलच्या सीसीटीव्ही फुटेजेसची तपासणी केली जात आहे. शिवाय, आरोपींनी बुक केलेल्या ऑनलाइन कॅबच्या नोंदी आणि इतर उपलब्ध माहितीचा वापर करून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास केला जात असून पोलिसांचे अनेक पथकं सध्या कार्यरत आहेत. तपास आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे या प्रकरणात पुढील कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे.