मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्र ते नेहरू तारांगण दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या उड्डाणपूल व सब वे प्रकल्पाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी बुधवारी ३० सप्टेंबर २०२६ रोजी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध कामांची सद्यस्थिती, प्रगती तसेच पुढील कार्यवाहीचा आढावा घेतला. प्रकल्पातील उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढवावा. ३१ जानेवारी २०२७ पर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश बांगर यांनी दिले.
नेहरू विज्ञान केंद्राच्या बाजूला १२०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य पाइलचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. एकूण १८ पैकी १७ पाइल कॅप, १८ पैकी १७ पिअर आणि १८ पैकी १७ पिअर कॅपचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, जिजामाता नगरच्या बाजूला १२०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य पायलिंगचे काम पूर्ण झाले आहे. एकूण १७ पैकी १७ पाइल कॅप, १७ पैकी १७ पिअर आणि १७ पैकी १७ पिअर कॅपचे काम पूर्ण झाले आहे. पोर्टल बीम व गर्डर निर्मितीचे काम प्रकल्पस्थळी तसेच निर्मिती केंद्रात सुरू आहे. एकूण १४ पैकी १४ पोर्टल बीमचे काम पूर्ण झाले असून, १८ गर्डर स्पॅनपैकी १७ गर्डर स्पॅनचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित १ गर्डर स्पॅनचे काम प्रगतिपथावर आहे.
महापालिका प्रशासनाच्यावतीने आता प्राधान्याने यासाठी घेतली जाणार मोहिम मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या माध्यमातून गारगाई पाणी ...
पोर्टल बीम व गर्डर स्पॅन उभारणीचे कामदेखील वेगाने सुरू आहे. एकूण १४ पैकी १३ पोर्टल बीमची उभारणी पूर्ण झाली असून, १८ पैकी ९ गर्डर स्पॅनची उभारणी पूर्ण झाली आहे. तसेच, डेक स्लॅब काँक्रिटीकरणाचे काम एकूण १८ स्पॅनपैकी ७ स्पॅनमध्ये पूर्ण झाले असून, आणखी २ स्पॅनचे काँक्रिटीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे.
नेहरू विज्ञान केंद्र उड्डाणपुलामुळे नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. सध्या या मार्गाने जाणाऱ्या वाहनचालकांना वरळी नाका (आचार्य अत्रे चौक) येथून वळसा घालून जावे लागते. प्रस्तावित उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळ सुमारे १५ मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. या पुलामुळे ई. मोझेस मार्गावरून थेट अॅनी बेझंट मार्ग तसेच धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गाकडे जाण्यासाठी अधिक सोपा आणि जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. लोअर परळ, महालक्ष्मी आणि करी रोडकडून येणाऱ्या वाहनांनाही या पुलाचा थेट वापर करता येणार आहे. परिणामी, वरळी नाका परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, प्रवासाचे अंतर व वाहतूक कोंडी कमी झाल्यामुळे वाहनचालकांच्या इंधनाचीही बचत होणार आहे.
प्रकल्पातील उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री व संसाधनांचे योग्य नियोजन करावे. कामकाजाचा वेग वाढवावा. प्रकल्पाचे काम विविध विभागांमध्ये आवश्यक समन्वय साधून पुढे न्यावे. वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून वाहतूक आराखडा तयार करावा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.
यावेळी प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्यासह संबंधित अधिकारी व अभियंते उपस्थित होते