ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे. मन प्रचंड दुःखी आहे. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. 'क्रांतिवीर' ते 'नटसम्राट' या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे.
परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो आहे. आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वतः नाना पुढे आले होते. मकरंद अनासपुरेजी आणि त्यांनी सोबत येत 'नाम फाऊंडेशन'ची स्थापना केली आणि स्वतः शिवारात जाऊन काम केले.
शेतकऱ्यांसाठी मदत करणे असो, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शांति 🙏
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 8, 2026
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ट्वीट करत दु:खद भावना व्यक्त केली आहे.
भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. नानांचे आणि माझे अतिशय जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. आपल्या दमदार अभिनयाने पाच दशकांहून अधिक काळ नाना पाटेकर यांनी मराठी व हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संवाद शैलीने त्यांनी चित्रपटातील अनेक पात्रे अजरामर केली व आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे जाणे ही भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी आहे. 'नाम फाऊंडेशन'च्या माध्यमातून पाणी संरक्षण, संचयन क्षेत्रांत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांनी दिलेला मदतीचा हात अनेक कुटुंबांचा आधार बनला. नाना एक उत्तम कलाकार-अभिनेते असण्याबरोबरच समाजाप्रती संवेदनशील असलेले एक व्यक्तिमत्त्व होते. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो. ॐ शांती.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 8, 2026
शरद पवार यांनी अत्यंत भावुक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे दुःखद वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असामान्य, संवेदनशील आणि प्रभावी पर्व आज संपले आहे. आपल्या दमदार अभिनयाने, आगळ्या संवादफेकीने आणि प्रत्येक भूमिकेतील विलक्षण सहजतेने त्यांनी रसिकांच्या मनावर कायमची अमिट छाप उमटवली. परिंदा, क्रांतिवीर, अग्निसाक्षी, अब तक छप्पन, वेलकम, नटसम्राट अशा अनेक चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू रसिकांना अनुभवायला मिळाले.
कलाकार म्हणून यशस्वी असतानाच सामाजिक प्रश्नांप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून केलेली कृतिशील समाजसेवा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तितकाच प्रेरणादायी पैलू होता. त्यांच्या निधनाने भारतीय कलाविश्वाने एक संवेदनशील आणि प्रतिभावान कलाकार, तर समाजाने एक कृतिशील व सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या अभिनयाची, विचारांची आणि सामाजिक कार्याची अमिट छाप सदैव स्मरणात राहील.
नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 8, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत ज्येष्ठ अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहली आहे.
Few actors possessed the intensity, individuality and unmistakable presence that Shri Nana Patekar Ji had. He brought remarkable versatility and creativity to every role and gave us characters that will be remembered for generations. He was also admired for his frank and forthright views, never hesitating to express what he believed in.
Shri Nana Patekar’s contribution to Hindi and Marathi cinema was immense. His passing leaves a deep void. My condolences to his family, friends and countless admirers. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2026
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रध्दांजली
महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा अभिमान आज हरपला.
रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत प्रत्येक बाबतीत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणाऱ्या व प्रखर सामाजिक जाणिवा जपणाऱ्या नाना पाटेकर यांचे अकल्पित निधन हा चित्रपटसृष्टीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी फार मोठा धक्का आहे.
महाराष्ट्राने आणि देशाने एक संवेदनशील, तगडा अभिनेता व खऱ्या अर्थाने एक 'नटसम्राट' गमावला आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा अभिमान आज हरपला...
नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवातच आमची भेट झाली होती. माझ्या दरेगावी गाळ उपसण्याच्या कामासाठी देखील ते आले होते, तेव्हा पांढऱ्या कपड्यांकडे बघत त्यांनी जाहीरपणे म्हटलं होतं— "एकही डाग नसलेला नेता!" २०२२ मधील राजकीय उठावानंतरच्या पहिल्या खाजगी भेटीत पाठीवर हात ठेवून "काय क्रांतिवीर..." अशी त्यांनी दिलेली साद आणि ती कौतुकाची थाप मी कधीच विसरू शकत नाही. त्या शब्दांनी जनतेसाठी अधिक काम करण्याची ऊर्जा दिली.
तरुणपणी 'क्रांतिवीर', 'तिरंगा', 'प्रहार' यांतील त्यांच्या भूमिकांनी आमच्या पिढीवर गारुड केले. 'हमिदाबाईची कोठी', 'पुरुष', 'तन-माजोरी' ही नाटके आणि 'देऊळ', 'यशवंत', 'वजूद', 'परिंदा' हे चित्रपट त्यांच्या अजरामर भूमिकांमुळे कायम लक्षात राहतील.
कुठलाही गॉडफादर नसताना, निव्वळ ताकदीच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा वेगळा ब्रँड उभा केला. बॉलीवूडमध्ये त्यांच्या नावाचा दबदबा होता आणि त्या दबदब्यात मराठी माणसाचा स्वाभिमान अन् बाणा त्यांनी ताठपणे जपला. नाना केवळ महान कलाकार नव्हते, तर ते महाराष्ट्राचा स्वाभिमान होते. 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे त्यांचे काम सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे आहे.
महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला आहे. मी एक सच्चा, दिलदार मित्र गमावला आहे. ही हानी कधीही भरून न येणारी आहे. त्यांच्यासारखा अभिनेता शतकातून एकदाच जन्माला येतो. काश्मीरमधील मुलांसाठी शाळा सुरू करण्याचं त्यांचं अखेरचं स्वप्न होतं, ते पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. तीच नाना पाटेकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 8, 2026