
आंध्र प्रदेशच्या मत्स्यव्यवसाय अभ्यास दौऱ्यादरम्यान भीमावरम येथील AquaExchangeच्या IoT-सक्षम मत्स्यपालन केंद्राला भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मत्स्यपालनाच्या दैनंदिन कार्यपद्धतीत होत असलेल्या बदलांची प्रत्यक्ष माहिती घेतली. तलावातील प्रत्यक्ष परिस्थितीचा डेटा घेऊन शेतकऱ्यांना निर्णय घेण्यासाठी उपयोगी माहिती देणे हे AquaExchange चे मुख्य वैशिष्ट्य आहे. या भेटीदरम्यान AquaExchangeच्या विविध तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांची सविस्तर माहिती घेण्यात आली. यामध्ये तलाव व पाण्याच्या गुणवत्तेचे रिअल-टाइम निरीक्षण, स्वयंचलित खाद्य व्यवस्थापन, AI आधारित फार्म इंटेलिजन्स, स्मार्ट ऊर्जा व्यवस्थापन, पीक मॉनिटरिंग, रोगांचे अचूक निदान तसेच डेटावर आधारित मत्स्यपालन व्यवस्थापन यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केवळ माहितीचे संकलन न करता त्याचे कृतीयोग्य विश्लेषण करून मत्स्यपालकांना जलद, अचूक आणि माहितीच्या आधारे निर्णय घेण्यास मदत केली जाते. त्यामुळे मत्स्यपालनातील संभाव्य धोके वेळेत ओळखणे आणि त्यावर आवश्यक उपाययोजना करणे अधिक सुलभ होते. IoT, AI आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा थेट मत्स्यपालनाच्या स्तरावर प्रभावी वापर कसा करता येऊ शकतो, याचे प्रत्यक्ष उदाहरण AquaExchangeच्या एकात्मिक तंत्रज्ञान प्रणालीतून पाहायला मिळाले. या तंत्रज्ञानामुळे उत्पादनक्षमता वाढविणे, खाद्य व इतर निविष्ठांचा योग्य वापर करणे, वीज व खाद्यावरील खर्च कमी करणे, उत्पादनातील नुकसान टाळणे तसेच अधिक शाश्वत मत्स्यपालनाला चालना देणे शक्य होत आहे.
आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यादरम्यान आज मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आंध्र प्रदेशच्या मत्स्य आयुक्तालयाच्या मुख्यालयास ...
महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय आणि अॅक्वाकल्चर क्षेत्रासाठी या तंत्रज्ञानामध्ये मोठी क्षमता आहे. महाराष्ट्रातील स्थानिक परिस्थितीनुसार अशा सिद्ध झालेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास मत्स्यपालन व कोळंबीपालन करणाऱ्या शेतकरी आणि मत्स्यव्यावसायिकांची कार्यक्षमता वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे, जोखमींचे प्रभावी व्यवस्थापन करणे आणि व्यवसायाची नफाक्षमता वाढविणे शक्य होईल, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. तंत्रज्ञान केवळ प्रयोगशाळा किंवा संशोधनापुरते मर्यादित न राहता ते प्रत्यक्ष शेततळ्यांपर्यंत पोहोचवून मत्स्यपालनाच्या दैनंदिन कार्यपद्धतीत प्रभावीपणे समाविष्ट करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय व मत्स्यपालन क्षेत्र अधिक आधुनिक, सक्षम, कार्यक्षम आणि शाश्वत करण्यासाठी तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने या अभ्यास दौऱ्यातून महत्त्वपूर्ण दिशा मिळाल्याचे मंत्री नितेश राणे यांनी नमूद केले.






