Thursday, October 8, 2026

महाराष्ट्राच्या पाणी चळवळीचा आधार हरपला : पद्मश्री डॉ. पोपटराव पवार

हिवरेबाजारच्या पाणी नियोजनाबाबत अतिशय आत्मीयतेने बोलणारे आणि महाराष्ट्रातील दुष्काळ व आत्महत्यांच्या प्रश्नावर मनापासून काम करण्याची तळमळ असलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आज आपल्यात नाहीत. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील पाणी चळवळीला, विशेषतः सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत, मोठा धक्का बसला आहे. नानाजींच्या जाण्याने पाणी चळवळीचा एक आधार हरपला असून, हे संकट दुष्काळापेक्षाही मोठे आहे, अशा भावना आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांनी व्यक्त केल्या.

नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा देताना डॉ. पवार म्हणाले, “आयुष्यभर लक्षात राहणारी नानाजींची मिठी आजही माझ्या स्मरणात आहे.”दिनांक ८ नोव्हेंबर २०१४ रोजी सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे हिवरेबाजार येथे आले होते. त्यावेळी महाराष्ट्रातील, विशेषतः मराठवाड्यातील दुष्काळ आणि विदर्भातील शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. मकरंद अनासपुरे यांनी त्यावेळी सांगितले होते की, “नानाजींचा निरोप घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे. आपल्याला दुष्काळ आणि आत्महत्यांच्या प्रश्नावर काहीतरी करायचे आहे,” अशी नानाजींच्या मनातील भावना आहे. त्यानंतर नाना पाटेकर यांच्यासोबत दुष्काळ, पाणी आणि शेतकरी प्रश्नांवर विविध चर्चा व बैठका झाल्या. या भेटींमधून नानाजींची महाराष्ट्रातील पाणीप्रश्नाबद्दलची आस्था आणि संवेदनशीलता प्रकर्षाने जाणवत होती.

यानंतर २२ सप्टेंबर २०१५ रोजी दादर येथील त्यांच्या मूळ घरी घरगुती गणपतीच्या निमित्ताने नानाजींनी डॉ. पवार यांना प्रसादासाठी घरी बोलावले होते. त्या भेटीची आठवण सांगताना डॉ. पवार म्हणाले की, नानाजींनी स्वतःच्या हाताने वाढलेली पुरणपोळी आजही स्मरणात आहे. त्याच भेटीत नानाजींनी डॉ. पवार यांना मारलेली आपुलकीची मिठी आणि त्यानंतर त्यांच्या चित्रपटातील प्रसिद्ध संवादाचा संदर्भ देत केलेला मिश्कील प्रश्न आजही मनात कोरला गेला आहे.

“नानाजींनी मला मिठी मारली आणि त्यांच्या खास शैलीत म्हणाले, ‘एक ही मच्छर है ना...’ त्यानंतर त्यांनी मिश्कीलपणे विचारले, ‘पोपटरावजी, खरोखर तुमच्या गावात डास-मच्छर नाहीत का?’ त्या क्षणी आलेले डोळ्यातील अश्रू आणि नानाजींची ती मिठी आजही विसरता येत नाही,” असे डॉ. पवार यांनी सांगितले.नानाजींच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर तीच आठवण पुन्हा डोळ्यांसमोर आली आणि डोळे पाणावले, असेही त्यांनी सांगितले.आज संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे मोठे सावट आहे. अशा परिस्थितीत पाणीप्रश्नाबाबत जनजागृती करणारा, दुष्काळग्रस्तांच्या वेदना समजून घेणारा आणि पाणी चळवळीला आधार देणारा नानाजींसारखा संवेदनशील व्यक्ती गमावणे ही मोठी हानी आहे. “महाराष्ट्राच्या पाणी चळवळीचा एक आधार असलेले नानाजी आज आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने पाणी चळवळीवर दुष्काळापेक्षाही मोठे संकट ओढावले आहे,” अशी भावपूर्ण श्रद्धांजली डॉ. पवार यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा