MLC Election: विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत फूट, परस्परांविरोधात अर्ज दाखल

विधान परिषदेच्या पाच जागा एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसांतच महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

मुंबई: विधान परिषदेच्या पाच जागा एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसांतच महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. अमरावती शिक्षक आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघांत मविआतील घटकपक्षांनी परस्परांच्या उमेदवारांविरोधात अर्ज दाखल केल्याने मैत्रिपूर्ण लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. अमरावतीत काँग्रेस आणि उबाठा, तर मराठवाड्यात उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आमनेसामने आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 9 ऑक्टोबरला संपणार असल्याने या दोन मतदारसंघांतील पेच सोडविण्यासाठी आघाडीतील नेत्यांकडे अवघे काही तास शिल्लक राहीले आहेत.


विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षक या तीन मतदारसंघांत आघाडीतील जागावाटपावर सध्या तुलनेने सहमती आहे. मात्र, अमरावती आणि मराठवाड्यातील उमेदवारीवरून तिन्ही पक्षांतील समन्वयाची परीक्षा सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवारी संपली असून, आता 9 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. काँग्रेसने अमरावती शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. उबाठाने दत्तात्रय लहाने यांना रिंगणात उतरवून 6 ऑक्टोबरला त्यांचा अर्जही दाखल केला. काँग्रेसने 3 ऑक्टोबरला पोहरे यांच्यासह नागपूर पदवीधरमधून विद्यमान आमदार अभिजित वंजारी आणि पुणे शिक्षकमधून जयंत आसगावकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती.



अदिती पोहरे या शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या असून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. संस्थेच्या कर्मचारीवर्गात मोठ्या संख्येने शिक्षक असल्याने शिक्षक मतदारसंघात त्यांना स्थानिक पातळीवर आधार मिळण्याची शक्यता काँग्रेसकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, उबाठानेही अमरावतीवरील दावा कायम ठेवला आहे. अमरावती आणि मराठवाडा या दोन्ही जागांवर उबाठाचे उमेदवार राहतील, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.


दुसरीकडे, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील चित्र आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. उबाठाने दिलीप घुगे यांना उमेदवारी देऊन 5 ऑक्टोबरला त्यांचा अर्ज दाखल केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने डॉ. प्रतापसिंह पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ हा पारंपरिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राहिला असून, या पक्षाने सलग तीन वेळा येथे विजय मिळवला आहे, असा दावा शरद पवार गटातील स्थानिक नेत्यांकडून करण्यात आला. त्यामुळे ही जागा आपल्या पक्षाला मिळावी, अशी त्यांची भूमिका आहे. अमरावतीबाबत शरद पवार गटाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. पक्षाच्या एका जिल्हाध्यक्षाने लहाने यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली; मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचे स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात आले.



9 ऑक्टोबरपर्यंत तोडग्याची संधी


महाविकास आघाडीतील मतभेदांबाबत सुप्रिया सुळे यांनी आघाडीत नाराजी नसून चर्चेतून प्रश्न सुटेल, अशी भूमिका मांडली आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी मराठवाडा जागेवरील शरद पवार गटाचा दावा मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. २३ ऑक्टोबरच्या पाचही जागांच्या निवडणुकीत एकत्र लढण्याचा निर्णय आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या बैठकीत झाला होता. मात्र, अंतिम जागावाटपावर तोडगा निघण्यापूर्वीच दोन मतदारसंघांत घटकपक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे अमरावतीत काँग्रेस-उबाठा आणि मराठवाड्यात उबाठा-शरद पवार गट यांच्यातील संभाव्य मैत्रिपूर्ण लढत टाळण्यासाठी आघाडीच्या नेतृत्वाकडे ९ ऑक्टोबरपर्यंतच वेळ आहे.

Comments
Add Comment

आंध्र प्रदेशच्या मत्स्यव्यवसायातील आधुनिक प्रयोगांचा महाराष्ट्रात उपयोग करणार : मंत्री नितेश राणे

आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यादरम्यान आज मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आंध्र

Nashik : अंबडमधील पिवळ्या रसायनमिश्रित पाण्याने खळबळ ! गरज भासल्यास संबंधित कंपन्या बंद करण्याची कारवाई करावी, मंत्री गिरीश महाजनांचे निर्देश

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांकडून प्रक्रिया न करता दूषित सांडपाणी सोडले जात असल्याच्या तक्रारींची

दुष्काळग्रस्त महाराष्ट्राची केंद्रीय पथकांकडून पाहणी सुरू; ११ सदस्यांचे पथक राज्यात दाखल

मुंबई : खरीप हंगामातील दुष्काळ आणि पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे ११

Olympics 2036 यजमानपदासाठी भारताची दावेदारी मजबूत; सहा देशांशी होणार कडवी टक्कर!

[caption id="attachment_1065067" align="aligncenter" width="800"] ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताची कामगिरी हवी तशी झालेली नाही. पण गेल्या काही

Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांची गर्दी ! कुंभमेळ्यात भाविकांची पायपीट होणार कमी, पोलिसांचे विशेष नियोजन

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे अमृत स्नानासाठी कोट्यवधी भाविक दाखल होण्याची

मंत्री नितेश राणे यांची आंध्रचे बंदरे मंत्री जनार्दन रेड्डी यांच्यासोबत बैठक; बंदरांच्या माध्यमातून औद्योगिकीकरणाला चालना देण्याच्या उपक्रमांबाबत चर्चा

महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आंध्र प्रदेशच्या सागरी आणि बंदरकेंद्रित