Sunday, October 11, 2026

नवरा-बायको दोघेही कमावतात, तरी बचत शून्य? ‘या’ ४ चुका ठरतात कारणीभूत!

घरात नवरा बायको दोघेही कामाला जातायंत पण तरीदेखील महिन्याच्या शेवटी बचत होत नाहीय? याचं कारण फक्त जास्त खर्च नाही तर पुरेसं आर्थिक नियोजन नसणं हेदेखील कारण असू शकतं. दोघांचा पगार आला तरीदेखील पैसे कुठे खर्च होत आहेत याचा हिशोब लागत नसेल तर हळू हळू आर्थिक गरजा मागे सुटत जातात. जोडप्यांकडून अशा काही आर्थिक चुका होऊ शकतात ज्यामुळे ते सेविंग्स करू शकत नाहीत. तज्ज्ञांनी याबाबत सांगितलेली कारणं समजून घेणं महत्त्वाचं आहे.

१) जेव्हा नवरा बायको हे दोघेही कमवत असतात, तेव्हा अनेकदा घर चालवण्यासाठी वेगळे बजेट बनवण्याची गरज नसल्याचं जोडप्यांना वाटतं. दोन पगारावर खर्च आपोआप चालून जातील, असा अनेक जोडप्यांचा समज असतो. पण बजेटशिवाय किराणा, ईएमआय, रेशन, मुलांच्या फीज, शॉपिंग आणि दुसऱ्या खर्चांचा हिशोब लागणं कठीण असतं. अशात महिन्याच्या शेवटी किती पैसे खर्च झाले याचा ताळमेळ लागणं कठीण होतं. यासाठी दोघांनी मिळून महिन्याचं बजेट बनवणं गरजेचं आहे. तसेच महत्त्वाचे खर्च आणि सेविंग्ससाठीची रक्कम आधीच ठरवून ठेवली पाहिजे.

२) काही जोडपे महिन्याला पैसे खर्च करतात आणि जे पैसे वाचतात ते सेविंग्स मध्ये टाकण्याचा विचार करतात. पण रोजच्या खर्चात सेविंग्ससाठी खूप कमी रक्कम उरते.यासाठी पगार आल्या आल्या खर्च आणि बचतीसाठी ठराविक रक्कम बाजूला काढणं गरजेचं आहे. जर ठराविक रक्कम दुसऱ्या सेविंग्स अकाउंट मध्ये टाकली तर ती खर्च होण्याची संभावना कमी असते.

३) जेव्हा पगार वाढतो तेव्हा परिवाराचा खर्च देखील वाढतो. महागडे फोन, बाहेरचं खाणं, फिरणं, शॉपिंग यावर जास्त पैसे खर्च होतात. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा पगार वाढतो पण त्याचबरोबर त्यासोबत आलेले खर्चदेखील वाढतात. पण सेविंग्सची रक्कम मात्र तेवढीच राहते. जेव्हा पगार वाढतो तेव्हा सेविंग्सची रक्कम वाढवणं देखील महत्त्वाचं आहे.

४) काही कुटुंबात बँक अकाउंट, खर्च, इएमआय, विमा आणि अन्य मोठ्या गोष्टींची जबाबदारी एकच माणूस घेतो. पण दुसरी व्यक्ती या गोष्टींपासून पूर्णपणे लांब असतो. सुरुवातीला हे सोपं वाटत पण यामुळे दोघांमध्ये आर्थिक माहितीसंदर्भात अंतर निर्माण होतं. जर कोणत्या कारणाने एक व्यक्ती उपलब्ध नसेल तर दुसऱ्या व्यक्तीला सेविंग्स बद्दल माहिती असणं आवश्यक आहे. यासाठी दोघांनी मिळून आर्थिक निर्णय घेणं महत्त्वाचं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >