
- बंडखोर अनिल सोलेंची माघार; गिरीश व्यास यांचाही राजीनामा मागे
मुंबई : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून भाजपमध्ये निर्माण झालेला अंतर्गत संघर्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर निवळला आहे. अपक्ष उमेदवारी दाखल करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अनिल सोले यांनी माघार घेत पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा जाहीर केला. दुसरीकडे, सोलेंच्या भूमिकेला पाठिंबा देत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणारे माजी आमदार गिरीश व्यास यांनीही राजीनामा मागे घेतला. त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात लढत होणार आहे.
भाजपने या निवडणुकीसाठी माजी आमदार सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या अनिल सोले यांनी अपक्ष अर्ज दाखल करून पक्षासमोर आव्हान उभे केले. त्यांना गिरीश व्यास यांनीही जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारासमोर स्वपक्षीय बंडखोरांचे आव्हान निर्माण झाले होते.
राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर निशाणा मुंबई : दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने काढण्यात आलेल्या मोर्चावर टीका करताना उपमुख्यमंत्री एकनाथ ...
या पार्श्वभूमीवर सोमवारी नागपुरात भाजपची महत्त्वाची बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे आमदार आणि प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. निवडणुकीच्या रणनीतीबरोबरच पक्षातील नाराजी दूर करण्यावरही चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस यांनी सोलेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची समजूत काढली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही सोलेंशी संवाद साधला होता. यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही सोलेंच्या घरी भेट दिली होती; मात्र त्या वेळी सोले घरी नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नव्हती.
निर्णयप्रक्रियेत बदलाचे आश्वासन
- अनिल सोले यांची नाराजी पक्षाच्या उमेदवारीच्या निर्णयापेक्षा निर्णय घेण्याच्या पद्धतीवर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सोले हे भाजपच्या नागपुरातील जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ नेते असून, त्यांनी कार्यकर्त्यांना सांभाळण्याचे काम केले आहे. पक्षाबद्दल त्यांची नाराजी नव्हती; निर्णय घेताना अधिकाधिक लोकांशी चर्चा व्हावी, अशी त्यांची अपेक्षा होती, असे फडणवीस यांनी सांगितले. - सोलेंच्या तक्रारींची नोंद घेण्यात आली असून, पक्षाच्या कार्यपद्धतीत आवश्यक बदल करण्याचे ठरल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. पक्षश्रेष्ठींच्या विनंतीनंतर सोलेंनी उमेदवारी मागे घेत कोहळे यांना निवडून आणण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. व्यास यांनीही राजीनामा मागे घेतल्याने नागपूर भाजपातील वादाला तूर्त विराम मिळाला आहे.






