Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’ (Chikeezing) हा आगामी मराठी कौटुंबिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा आकर्षक टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यातील भावस्पर्शी दृश्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. बालपणीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या चित्रपटाची जगभरातील १६ प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी अधिकृत निवड झाल्याची माहितीही समोर आली आहे.



काय आहे ‘चिकीझिंग’च्या टीझरमध्ये ?


‘चिकीझिंग’च्या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे चिक्या नावाचा एक अवखळ, चुणचुणीत आणि स्वप्नाळू मुलगा. शाळेपेक्षा शाळेबाहेरील जगात अधिक रमणाऱ्या या मुलाच्या नजरेतून त्याची स्वप्ने, कुतूहल आणि भावविश्व उलगडत जाते. टीझरमध्ये धुक्याने वेढलेल्या डोंगराळ परिसराचे आणि निसर्गरम्य हिलस्टेशनचे सुंदर चित्रण पाहायला मिळते. दर शनिवारी आईसोबत एका आलिशान निवासी शाळेच्या परिसरात जाणारा चिक्या तेथील भव्य इमारती आणि बंद प्रवेशद्वार पाहून भारावून जातो. त्या शाळेच्या आत असलेले समृद्ध जग त्याच्यासाठी आकर्षणाचा आणि कुतूहलाचा विषय बनते. मुलांचे खेळ, गलोलीने केलेली धमाल, साधी घरे, डोंगररांगा आणि चिक्याच्या डोळ्यांत दिसणारी मोठी स्वप्ने अशा विविध दृश्यांमधून चित्रपटाची भावनिक बाजू समोर येते. ‘चला चला मामाच्या गावाला...’ या गाण्याची पार्श्वभूमी टीझरला आणखी खास बनवते.



दिग्दर्शकांनी सांगितला टीझरमागील विचार


दिग्दर्शक राजेंद्र बगाटे आणि वैभव कुलकर्णी यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून बालपणातील निरागसता आणि स्वप्नांच्या जगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते, ‘चिकीझिंग’चा टीझर ही केवळ चित्रपटाची झलक नसून प्रेक्षकांना त्यांच्या बालपणीच्या आठवणींशी पुन्हा जोडणारा भावनिक अनुभव आहे. चित्रपटातील संगीत आणि आगामी गाणी सर्व वयोगटांतील प्रेक्षकांना आवडतील, असा विश्वासही दिग्दर्शकांनी व्यक्त केला आहे. मनोरंजनासोबतच भावनिक नाते निर्माण करणारा हा कौटुंबिक चित्रपट ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



चित्रपटात कोणते कलाकार झळकणार ?


‘चिकीझिंग’मध्ये प्रभाकर मोरे, कृष्णराज वाईंगडे, सेजल कोरे, अमृता सुरेश, गायत्री देशपांडे, आदित्य घनश्याम, राहुल कुलकर्णी आणि डॉ. सोनाली घाटणेकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाचे लेखन, कथा आणि पटकथा राजेंद्र बगाटे व वैभव कुलकर्णी यांनी साकारली आहे. प्रवीण सोनावणे यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली असून, श्रीनिधी वेंकट आणि हृषिकेश कुलकर्णी यांनी संगीत दिले आहे. शेखर गुरव आणि एस. शंकर यांनी संकलन केले आहे, तर सुरेश कुंभार यांनी कला दिग्दर्शन आणि वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे.



निर्मितीची जबाबदारी कोणाकडे ?


दीपक वाणी आणि जयप्रकाश भांडे प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती ए थीमटीम स्टुडिओ प्रॉडक्शनने कीफ्रेम प्रॉडक्शनच्या सहकार्याने केली आहे. सुप्रिया बगाटे या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. शब्बीर साबुवाला, रचना वोरा, ऋषिकेश देशमुख, सिड विंचुरकर, करण चव्हाण आणि उमेश कुलकर्णी यांनी सहनिर्माते म्हणून काम पाहिले आहे.



‘चिकीझिंग’ कधी होणार प्रदर्शित ?


बालपण, कुटुंब, मैत्री आणि स्वप्नपूर्तीचा प्रवास उलगडणारा ‘चिकीझिंग’ हा चित्रपट येत्या १९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबाला एकत्र पाहता येईल, असा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात कितपत स्थान निर्माण करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार

Koffee with Karan: - "मेरे करण अर्जुन आएंगे..." निर्माता करण जोहर नवा चित्रपट आणण्याच्या तयारीत...

चित्रपट निर्माता करण जोहरयाने आजवर वेगवेगळ्या कार्यक्रमातून चाहत्याची मने जिंकली आहेत. आता करण जोहर 'कॉफी विथ

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरात वातावरण तापलं! नकुलसाठी आसिफवर चिडली लव्ह; यंग आणि स्काऊटमध्ये सुद्धा बाचाबाची

Bigg Boss 20 च्या घरात नेहमीच काहीना काही रंजक गोष्टी घडत असतात. अनेकदा स्पर्धकांमध्ये भांडणं होतात. कधी कधी तर ही भांडणं

Koffee With Karan Season 9: करण जोहरच्या शोचा अखेरचा सीझन; पुन्हा रंगणार सेलिब्रिटींचा बेधडक अंदाज?

मुंबई : लोकप्रिय सेलिब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण’चा नववा सीझन प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. करण जोहर होस्ट करत

Pahla pyaar doosri baar Posters : सहा नव्या जोड्या, प्रेमाची नवी गोष्ट! ‘पहला प्यार दूसरी बार’च्या हटके पोस्टर्सनी वाढवली उत्सुकता

लव्ह फिल्म्सने सहा नव्या चेहऱ्यांच्या जोड्यांचे आकर्षक पोस्टर्स प्रदर्शित केले आहेत. या पोस्टर्समधून

Rashmika & Vijay : रश्मिका आणि विजयचा शाही अंदाज! 'रणबाली'च्या प्रमोशनसाठी हैदराबादमध्ये केले खास ट्विनिंग

सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आणि विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) यांनी त्यांच्या आगामी 'रणबाली' या