मुंबई (विशेष प्रतिनिधी)
वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर करण्यात आला. परंतु हा प्रस्ताव मंजूर करतानाच वरळी कोळीवाड्यात अनधिकृत बांधकामे आणि झोपड्या वाढत असल्याची तक्रार नगरसेवकांनी मांडली. त्यामुळे वरळी समुद्र किनाऱ्याची जर आपण स्वच्छता राखून हा परिसर पर्यटन स्थळ निर्माण करत असून जर या कोळीवाड्यात अनधिकृत बांधकामे झाली असतील तर त्यावर त्वरीत कारवाई करण्याचे निर्देश स्थायी समितीने प्रशासनाला दिले आहेत.
वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेच्या कामाचा प्रस्ताव महापालिका स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला असता उबाठाच्या श्रध्दा जाधव यांनी याठिकाणी टन कचरा उचलला जातो तसेच किती यंत्र सामृग्रीचा वापर केला जातो असा सवाल करत प्रमुख पर्यटन स्थळे असलेल्या समुद्र किनारे आणि मासेमारी व्यवसाय प्रामुख्याने करण्यात येतो. असे किती समुद्र किनारे किती आहे याची विचारणा केली. अश्रफ आझमी यांनी वरळी कोळीवाड्याच्या समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता तेथील मंडळांच्या मदतीनेच करून घेण्यात यावी अशी सूचना केली. तर समुद्र किनारे आणि कोळीवाड्यांचा विचार पर्यटनाच्यादृष्टीकोनातून व्हायला हवी. त्यासाठी स्वच्छता व्हायला हवी अशी सूचना यामिनी जाधव यांनी केली. तसेच तिथे शुल्क आकारुन कपडे बदलण्याची जागाही उपलब्ध करून दिली जावी अशी सूचना जाधव यांनी केली. डॉ सईदा खान यांनी एखादा तरी समुद्र किनारा हा प्रायोगिक तत्वावर हाती घेण्यात यावे अशी सूचना केली.
मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी आज समुद्र किनाऱ्यांवर डेब्रीज टाकले जाते आणि हेच डेब्रीज कचऱ्यातून उचलले जाते. कोळीवाड्यांमध्ये जर अनधिकृत बांधकाम होते. त्याचे डेब्रीज किनाऱ्यांवरच टाकले जात. त्यामुळे कोळीवाड्यातील या अनधिकृत बांधकामांमुळे समुद्र किनाऱ्यांवर अतिक्रमण केले जात असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच येथील कचऱ्यात रेती जमा होत असल्याने कचऱ्याचे वजन वाढते. मग या कचऱ्याचे मापन कशाच्या आधारावर केले जात असा सवाल करत हा कचरा कोणत्या डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो अशी विचारणा केली. तर उबाठाचे यशाेधर फणसे यांनी वर्सोवा कोळीवाड्याचीही स्वच्छता केली जावी अशी सूचना करत याठिकाणी मोठ्याप्रमाणात अतिक्रमणे असल्याची तक्रार केली.
वरळी समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याची जबाबदारी महापालिकेने स्वीकारली असून विभागाने खात्री केल्यानंतर याच्या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. समुद्र किनारे स्वच्छ राखणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. सर्व ठिकाणी सार्वजनिक टॉयलेटची सुविधा उपलब्ध असून जिथे नाही तिथे विचार केला जाईल,असे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले. यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सदस्यांनी ज्या ज्या सूचना केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी व्हावी असे सांगत वरळी कोळीवाड्यात जर अनधिकृत झोपड्या बनल्या असतील तर त्याची पाहणी करून त्वरीत त्या हटवण्यात याव्यात अशी निर्देश प्रशासनाला दिले. तसेच यामिनी जाधव यांनी पर्यटन स्थळाबाबत केलेल्या सूचनांची दखल घेतली जावी अशी सूचना केली.