तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश
राज्यातील रस्ते विकास आणि मुंबईतील महत्त्वाच्या शासकीय इमारतींच्या बांधकामाला गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आढावा बैठक घेतली.
October 15, 2026 08:38 PM
तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश (Photo: @Shivendraraje11 X Account)
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट आढावा घेतला. या आढावा बैठकीत एअर इंडिया इमारतीचे नूतनीकरण, मंत्रालय परिसरातील नवीन प्रशासकीय इमारत, मनोरा आमदार निवासाची पुनर्बांधणी आणि उमरखेड-महागाव मतदारसंघातील रस्ते विकासकामांच्या प्रगतीची सविस्तर चर्चा झाली. प्रकल्पांचे नियोजन चोख ठेवून सर्व कामे विहित मुदतीत आणि उत्कृष्ट दर्जासह पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. मुंबईतील शासकीय इमारतींचे नूतनीकरण आणि राज्यातील रस्ते विकास ही जनतेच्या हक्काच्या सुविधा आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रकल्पाचे काटेकोर नियोजन आणि गुणवत्तेवर आमचे बारीक लक्ष आहे. कामाची गती वाढवण्यासाठी आणि वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी एकमेकांशी ताळमेळ ठेवून अडचणी त्वरित मार्गी लावाव्यात, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले आहेत.
नवीन प्रशासकीय इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
मंत्रालय परिसरातील गार्डन गेटजवळ उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना उर्वरित कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्रीमध्ये वाढ करावी, कामाचा वेग वाढवावा आणि विविध कामांमध्ये योग्य समन्वय राखावा, असे निर्देश मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना दिले.
मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार, ...
मनोरा आमदार निवासाच्या कामांचा आढावा
मुंबईतील मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीच्या कामाची पाहणी करून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बांधकामाच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी फ्लॅटची गुणवत्ता, फ्लोअरिंग तसेच सुरू असलेल्या विविध कामांची तपासणी करण्यात आली.मनोरा आमदार निवासाच्या बांधकामाचा दर्जा उच्च राखून सर्व कामे नियोजनानुसार पूर्ण करावीत. तसेच सुरू असलेल्या कामांचा नियमित आढावा घेऊन उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकासकामांच्या अनुषंगाने आमदार किसन वानखेडे यांच्यासमवेत बैठक घेऊन विविध रस्त्यांच्या सुधारणा व रुंदीकरणाच्या कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील रस्ते अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि वाहतुकीसाठी सुकर करण्यासोबतच नागरिकांच्या दळणवळणाच्या सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.