मुंबई (विशेष प्रतिनिधी)
गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासह विद्याविहार पुलाच्या कामांवर शेवटचा हात फिरवला जात आहे.विद्याविहार पुलावर नॉईज बॅरियर्स तर गोरेगाव पुलावर ध्वनी प्रतिबंधक अर्थात नॉईज बॅरियर्ससह रस्त्यावर मायक्रो सरफेसिंगचेही काम शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे येत्या काही दिवसांतच हे काम पूर्ण झाल्यानंतरच याचे लोकार्पण केले जाणार आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत भरून काढण्यासाठी समुद्राचे पाणी गोडे ...
मुंबईतील गोरेगाव पुलाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर तेथील रस्त्याच्या बांधकामाबाबत विरोधी पक्षाच्यावतीने जोरदार टिका झाल्यानंतर महापालिका प्रशासन आणि सत्ताधार पक्षानेही आता ताकही फुंकून प्यावे त्याप्रमाणे पुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम घाईत न आटोपता काम पूर्ण झाल्यानंतर आणि त्याची शाहनिशा झाल्यानंतरच लोकार्पण करण्याचा निर्धार केला आहे. या गोरेगाव मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगर दरम्यानच्या या पुलासह विद्याविहार रेल्वे स्थानकावरील रेल्वे पूल आणि शीव रेल्वे स्थानक रेल्वे पुलांचे लोर्कापण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मागील मंगळवारी करण्याचे जवळपास निश्चित केले होते. परंतु सरतेशेवटी हा लोकार्पण सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
विद्याविहार रेल्वे पुलावरील नॉईज बॅरियर्स बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर गोरेगाव रस्ते पुलावर नॉईज बॅरियर्स बसवण्याचे काम सुर आहे. आता पर्यंत नॉईज बॅरियर्स बसवण्याचे काम दोन्ही बाजुला ७० टक्के पूर्ण झाले आहे. तर रस्त्यावरील डांबरी पृष्ठभागाचा एक सहा एमएमचा थर चढवणे शिल्लक आहे. मायक्रो सरफेसिंग आणि ब्रशिंगचे काम अद्यापही व्हायचे आहे. त्यामुळे या पुलाची काही कामे शिल्लक असल्यामुळे घाईघाईत लोकार्पण करून विरोधकांना टीका करण्याची संधी दिली जावू नये याच हेतूने या पुलांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळेही विद्याविहार आणि गोरेगाव पुलांची कामे पूर्ण झाल्याची खातरजमा झाल्यानंतर याच्या लोकार्पणाची तारीख मुख्यमंत्र्यांकडून मिळवून ही पूल वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे.
विशेष म्हणजे गोरेगाव पुलाचे काम काम ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण करून वाहतुकीस खुला करण्याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट होते. त्यानंतर ही डेडलाईन १५ जुलै पर्यंत वाढण्यात आली होती. त्यानंतर आता याचे लोकार्पण या ऑक्टोबर २०२६ मध्ये होणार आहे.
दिंडोशी - गोरेगाव - दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान १.२६ किलोमीटर लांबीचे उड्डाणपूल आहे. दिंडोशी न्यायालयापासून उड्डाणपुलास सुरुवात होते. रत्नागिरी जंक्शन हॉटेल येथे ९० अंश कोनात उड्डाणपूल वळतो.