Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील बदलत्या हवामानामुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रातही काही भागांत पावसाचा अंदाज असून, मुंबई आणि ठाणे परिसरात उष्ण व दमट हवामानाचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता
हवामानाच्या अंदाजानुसार, 22 ते 28 ऑक्टोबरदरम्यान दक्षिण-पूर्व बंगालचा उपसागर आणि लगतच्या अंदमान समुद्र परिसरात चक्रवाती वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. तसेच दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप परिसरातही हवामानातील बदल दिसून येत आहेत. या घडामोडींमुळे दक्षिण भारतातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर आली आहे. बदलापूरच्या स्केल ऍन्ड टेल्स ...
महाराष्ट्रात कुठे पडणार पाऊस?
महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावरील काही भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ताशी 30 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई आणि ठाणे परिसरात उष्ण व दमट हवामानामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या ताज्या सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दक्षिण भारतासह उत्तर भारतातही पावसाची शक्यता
तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ आणि दक्षिण कर्नाटकातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतातही पश्चिमी झंझावातांच्या प्रभावामुळे हवामानात बदल होऊ शकतात. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही भागांत पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, विदर्भ, छत्तीसगड आणि दक्षिण मध्य प्रदेशातील काही भागांत रात्रीचे किमान तापमान सामान्यपेक्षा 1 ते 3 अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता आहे. पॅसिफिक महासागरातील अल निनोच्या स्थितीवरही हवामान तज्ज्ञांचे लक्ष आहे.
हवामानातील या बदलांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्थानिक हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे. वादळी पावसाचा इशारा असलेल्या भागांत झाडांखाली थांबणे टाळावे आणि प्रवासापूर्वी हवामानाचा अंदाज तपासावा.