Friday, October 16, 2026

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

पश्चिम आशियातील सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंडिगोने रियाध, जेद्दा, दम्माम आणि मदिना या शहरांसाठीची सर्व उड्डाणे 24 ऑक्टोबर 2026 पर्यंत रद्द केली आहेत. अकासा एअरने रियाधसाठी 24 ऑक्टोबरपर्यंत आणि जेद्दासाठी 21 ऑक्टोबरपर्यंत विमानसेवा स्थगित ठेवली आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी फ्लाइट स्टेटस तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या प्रमुख विमान कंपन्यांनी सौदी अरेबियासाठीच्या विमानसेवेच्या निलंबनाला मुदतवाढ दिली आहे. रियाध, जेद्दा, दम्माम आणि मदिना या शहरांकडे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला असून, ऐन प्रवासाच्या वेळी नियोजन कोलमडले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला असला, तरी आखाती देशांमधील या अस्थिरतेमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाण वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला आहे.

इंडिगो आणि अकासा एअरचा निर्णय

इंडिगो विमान कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर अधिकृत माहिती देत सौदी अरेबियातील रियाध, जेद्दा, दम्माम आणि मदिना या प्रमुख शहरांसाठीची सर्व येणारी आणि जाणारी उड्डाणे 24 ऑक्टोबरपर्यंत रद्द ठेवल्याचे जाहीर केले आहे. याआधी ही सेवा 17 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांना त्यांच्या नोंदणीकृत संपर्क क्रमांकावर एसएमएस किंवा ईमेलद्वारे माहिती दिली जात आहे. प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी आपल्या फ्लाइटची सद्यस्थिती आवर्जून तपासावी, असे आवाहन इंडिगोतर्फे करण्यात आले आहे.

अकासा एअरच्या उड्डाणांनाही मुदतवाढ

इंडिगोप्रमाणेच अकासा एअरनेही पश्चिम आशियातील सध्याच्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेत सौदी अरेबियासाठीच्या विमानसेवेवर निर्बंध कायम ठेवले आहेत. कंपनीच्या नव्या घोषणेनुसार, रियाधसाठीची विमानसेवा 24 ऑक्टोबरपर्यंत, तर जेद्दासाठीची विमानसेवा 21 ऑक्टोबरपर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहे. परिस्थितीवर सातत्यपूर्ण लक्ष ठेवले जात असून सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतरच पुढील उड्डाणांबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे अकासा एअरने स्पष्ट केले आहे.

प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

यापूर्वी इंडिगो, एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस आणि अकासा एअर या सर्वच प्रमुख कंपन्यांनी 17 ऑक्टोबरपर्यंत उड्डाणे रद्द केली होती. मात्र, पश्चिम आशियातील अनिश्चित परिस्थितीमुळे आता इंडिगो आणि अकासा एअरने ही मुदत वाढवली आहे. या बदलांमुळे सौदी अरेबियाला जाणाऱ्या किंवा तेथून परतणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. कोणत्याही गैरसोयीपासून वाचण्यासाठी संबंधित प्रवाशांनी विमानतळाकडे रवाना होण्यापूर्वी विमान कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा ग्राहक सेवेद्वारे आपल्या उड्डाणाची अद्ययावत माहिती घेणे अत्यंत आवश्यक ठरत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >