Friday, October 16, 2026

75 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान! INS समर्थक भारतीय नौदलात दाखल, काय आहेत क्षमता?

भारतीय नौदलाच्या ताफ्यात स्वदेशी बनावटीच्या ‘INS समर्थक’ या बहुउद्देशीय नौकेचा समावेश झाला आहे. 16 ऑक्टोबर 2026 रोजी कारवार नौदल तळावर ही नौका सेवेत दाखल झाली. L&T ने तयार केलेल्या या नौकेत 75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्री असून, सागरी देखरेख, ड्रोन ऑपरेशन, शस्त्रास्त्र चाचण्या आणि आपत्ती व्यवस्थापन अशा विविध कामांसाठी तिचा वापर होणार आहे. या नौकेमुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला आणखी बळ मिळणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय सागरी सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलत भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस समर्थक’ या अत्याधुनिक बहुउद्देशीय युद्धनौकेचा अधिकृतपणे समावेश करण्यात आला आहे. कर्नाटकातील कारवार नौदल तळावर पार पडलेल्या एका भव्य आणि स्वागताहक सोहळ्यात नौदलप्रमुख ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांच्या हस्ते या शक्तिशाली नौकेला नौदल सेवेत दाखल करण्यात आले. या नव्या युद्धनौकेच्या समावेशामुळे भारताच्या सागरी सीमांची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होणार असून, शत्रूच्या कोणत्याही आक्रमक आव्हानाला आणि संकटांना अधिक प्रभावीपणे प्रत्युत्तर देणे आता भारतीय नौदलाला आणखी सहज शक्य होणार आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या प्रवासात हा एक ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.

‘मेक इन इंडिया’चे सुयश आणि स्वदेशी बनावट

‘आयएनएस समर्थक’ या अत्याधुनिक नौकेच्या निर्मितीमुळे भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला अभूतपूर्व बळ मिळाले आहे. देशातील नामांकित कंपनी असलेल्या लार्सन अँड टुब्रो (L&T) द्वारे या युद्धनौकेची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत जवळपास 75 टक्क्यांहून अधिक भारतीय बनावटीच्या सुट्या भागांचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, जो भारताच्या आत्मनिर्भरतेचे उत्तम उदाहरण आहे. संरक्षण मंत्रालयाने या युद्धनौकेच्या बांधणीसाठी 887 कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण करार केला होता. 106 मीटर लांबी आणि 16.8 मीटर रुंदी असलेल्या या नौकेचा कमाल वेग ताशी 27 किलोमीटर म्हणजेच 15 नॉट्स इतका असून, ही ‘समर्थक’ श्रेणीतील पहिलीच नौका आहे. याच मालिकेतील दुसरी ‘उत्कर्ष’ नौका सध्या चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहे.

बहुउद्देशीय क्षमता आणि आधुनिक वैशिष्ट्ये

ही युद्धनौका केवळ युद्धापुरती मर्यादित नसून ती एक बहुउद्देशीय ‘मदरशिप’ म्हणूनही अत्यंत प्रभावीपणे कार्य करू शकते. या एकाच मुख्य कमांडच्या माध्यमातून विविध प्रकारच्या मोहिमा एकाच वेळी राबवण्याची अनोखी क्षमता हिच्यात आहे. नौकेवर तोफखाना तैनात करण्यासोबतच ड्रोन प्रक्षेपित करण्याची आधुनिक सुविधा देण्यात आली आहे. गस्त घालताना समुद्राच्या तळातून विविध वस्तू बाहेर काढणे, बिघडलेल्या किंवा संकटात सापडलेल्या जहाजांना सुरक्षितपणे किनाऱ्यावर ओढून आणणे यासारखी कठीण कामे ती लीलया पार पाडू शकते. याशिवाय, आपत्कालीन परिस्थितीत या नौकेचा वापर फिरत्या रुग्णालयासारख्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांसाठीही करता येणार आहे.

मानवतावादी कार्य आणि आपत्ती व्यवस्थापन

युद्धीय कौशल्यांसोबतच मानवतावादी मदतकार्य आणि पर्यावरण संरक्षणासाठी ही नौका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. समुद्रातील संशयास्पद हालचालींवर बारीक देखरेख ठेवणे, चक्रीवादळे किंवा महापूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात किनारपट्टीवरील नागरिकांना तातडीने मदत पुरवणे ही या नौकेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. भविष्यातील कोणत्याही सागरी आघाडीवर किंवा आपत्कालीन परिस्थितीत भारतीय नौदल मागे राहणार नाही, याची खात्री या नौकेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकल्पामुळे भारताची सागरी ताकद जागतिक स्तरावर अधिक उंचावली असून हिंद महासागर क्षेत्रात भारताचे धोरणात्मक स्थान अधिक बळकट झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >