Friday, October 16, 2026

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मराठवाड्यातील रुग्णांसाठी जालन्यात आरोग्यसेवेचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महिको रिसर्च फाऊंडेशन ट्रस्टच्या नेत्रालयालगतच्या 3 हेक्टर शासकीय जमिनीवर कर्करोग, हृदयरोग, डायलेसिस, बालरोग आणि इतर गंभीर आजारांवरील उपचार सुविधा तसेच वैद्यकीय शिक्षणाचे अभ्यासक्रम सुरू करण्यास विशेष अटींवर परवानगी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील आरोग्य सुविधांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील महिको रिसर्च फाऊंडेशन ट्रस्टच्या नेत्रालयाला लागून असलेली तब्बल ३ हेक्टर शासकीय जमीन आता आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाच्या विस्तारासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मूळ नेत्रालयाच्या सेवेला कोणताही धक्का न लावता, या जागेवर वाढीव वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा सुरू करण्यास राज्य सरकारने विशेष अटींवर परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या या दूरगामी निर्णयामुळे मराठवाड्यातील रुग्णांना उपचारासाठी आता दूरवर भटकंती करण्याची गरज उरणार नाही.

गंभीर आजारांवर स्थानिक पातळीवरच उपचारांची सोय

आता या विस्तारित ठिकाणी औषधनिर्माणशास्त्र म्हणजेच फार्मसी सोडून जनरल मेडिसीन, डायलेसिस, हाडांचे आजार, कान-नाक-घसा, बालरोग, हृदयरोग, मेंदूविकार, रक्ताचे आजार आणि कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांवर उपचाराच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. याशिवाय नर्सिंग कॉलेज, ऑप्टोमेट्री कॉलेज, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन आणि अनेस्थेशिया असिस्टंट यांसारखे महत्त्वाचे वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षणाचे अभ्यासक्रमही येथे सुरू करता येणार आहेत. हे सर्व अभ्यासक्रम केवळ संस्थेत प्रत्यक्ष दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवांशीच संबंधित असणे बंधनकारक असेल. कोणतीही नवीन शैक्षणिक सुविधा सुरू करण्यापूर्वी ती रुग्णालयाच्या प्रत्यक्ष सेवेशी जोडलेली असल्याची खात्री जालना जिल्हाधिकाऱ्यांकडून करून घेणे आवश्यक राहणार आहे.

पारदर्शकता आणि परवडणाऱ्या दरात वैद्यकीय सेवांचा लाभ

या संपूर्ण जमिनीचा आणि सुविधांचा वापर निव्वळ सार्वजनिक हितासाठी आणि पूर्णपणे ना-नफा तत्त्वावरच करावा लागणार आहे. सर्वसामान्य रुग्णांना अत्यंत परवडणाऱ्या दरात औषधे, गोळ्या, इंजेक्शन्स आणि वैद्यकीय साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी 'जनऔषधी केंद्र' किंवा ना-नफा तत्त्वावरील औषध विक्री केंद्र सुरू करण्याची मुभा देखील देण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पावर आणि नियमांच्या पालनावर जालना जिल्हाधिकारी तसेच छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त विशेष लक्ष ठेवणार आहेत. अटींचा भंग झाल्यास शासनाद्वारे योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

आरोग्य हीच खरी ईश्वरसेवा - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

या महत्त्वपूर्ण निर्णयावर भाष्य करताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोग्यसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. "आरोग्य हीच खरी ईश्वरसेवा आहे. कर्करोग आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांवर उपचारासाठी गोरगरिबांना पैशांअभावी किंवा उपचारासाठी दूरवर भटकंती करावी लागणे अत्यंत वेदनादायी असते. जालन्यातील या नवीन प्रकल्पामुळे आता सर्वसामान्य जनतेला त्यांच्याच भागात अत्यंत माफक आणि परवडणाऱ्या दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >