माफी नाही! निळ्या ड्रम हत्याकांडानंतर आता 'साप कांडा'तील दोषींनाही फाशी, मेरठ न्यायालयाचा निर्णय
मेरठमध्ये अमित कश्यप हत्याकांडातील आरोपी पत्नी आणि तिचा प्रियकर अमरदीप यांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. मेरठ न्यायालयाने दोन दिवसात दुसरी फाशीची शिक्षा सुनावली आहे.
October 16, 2026 05:27 PM
माफी नाही! निळ्या ड्रम हत्याकांडानंतर आता 'साप कांडा'तील दोषींनाही फाशी, मेरठ न्यायालयाचा निर्णय (Photo: ANI)
निळ्या ड्रम हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर अवघ्या दोन दिवसात आणखी एका प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. मेरठ न्यायालयाने अमित कश्यप हत्याप्रकरणात ही शिक्षा सुनावली आहे. रविता आणि तिचा प्रियकर अमरदीप यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन प्रकरणानुसार, रविताने तिचा प्रियक अमरदीपच्या मदतीने पतीची हत्या केली होती. तसेच त्याचा मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याचा बनाव रचला होता. पण पोलीस तपासात सर्वकाही उघड झालं आणि त्या दोघांना बेड्या ठोकल्या गेल्या. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर खटला सुरू झाला. या प्रकरणात 12हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याते. तसेच 16 सुनावण्यानंतर न्यायालयाने रविता आणि तिचा प्रियकर अमरदीप याला दोषी धरलं. पीडित कुटुंबियांनी या दोघांना फाशीची शिक्षा व्हावी, न्याय मागितला होता. अखेर दीड वर्षांनी या प्रकरणात न्यायालयाने निकाल दिला असून दोघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
रविता अमरदीप प्रकरण काय आहे?
पोलिसांच्या माहितीनुसार, 12 एप्रिल 2025 च्या रात्री अमित कश्यप झोपल्यानंतर अमरदीप त्याच्या घरी आला. तेव्हा रविताने झोपलेल्या अमितचे हात धरले, तर अमरदीपने त्याचा गळा दाबला. त्यामुळे गुदमरून अमितचा मृत्यू झाला. पण ही हत्या नैसर्गिक वाटावी म्हणून अमरदीपने एका गारूड्याकडून 1000 रुपयांना साप विकत घेतला होता. तसेच हा साप अमितच्या मृतदेहाजवळ ठेवला. जेणेकरून हा मृत्यू सर्पदंशाने झाला असं वाटावं. 13 एप्रिलला सकाळी अमितचा मृतदेह त्याच्या पलंगावर आढळला. तसेच त्याच्या शरीरावर सर्पदंशाच्या खुणा होत्या आणि सापही आढळून आला. त्यामुळे सुरूवातीला हा मृत्यू सर्पदंशाने झाल्याचं मानलं गेलं.
Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या ...
काय म्हणाली अमित कश्यपची आई?
अमित कश्यपचा मृतदेह त्यानंतर शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेला गेला. तेव्हा पत्नी रविता आणि तिचा प्रियकर अमरदीप यांचा बनाव उघड झाला. शवविच्छेदन अहवालात अमितचा मृत्यू गुदमरून झाल्याचं समोर आलं. त्यामुळे अमितच्या आईला धक्का बसला. अमितच्या आईने या दोघांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. अमितची आई मुनेश देवी म्हणाल्या की, "ज्या क्रूरतेने तिच्या मुलाची हत्या करण्यात आली, त्यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा मिळायलाच हवी होती. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाने आनंदी आहोत. रविताने तीन मुलांना वडिलांविना पोरके केले आहे. जसा माझ्या मुलाचा छळ झाला, तशीच शिक्षा या दोघांना देण्यात आली. आता माझ्या आत्म्याला शांती मिळेल."