सिंधुदुर्ग : दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. अशा परिस्थितीत लोकसहभागातून उभ्या राहणाऱ्या जलसंधारणाच्या कामांना बळ देण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दोडामार्ग तालुक्यातील झरेबांबर-आंबेली येथे वनराई बंधाऱ्याच्या उभारणीत प्रत्यक्ष श्रमदान केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनीही श्रमदानात सहभाग घेतला. याचवेळी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘घर तिथे शोषखड्डा’ अभियानांतर्गत शोषखड्ड्याच्या कामाचा प्रारंभही पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला.
दुष्काळाच्या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी केवळ प्रशासकीय उपाययोजना बरोबर लोकसहभागातून जलसंधारणाची व्यापक चळवळ उभी राहणे आवश्यक आहे. या भूमिकेतून झरेबांबर-आंबेली येथील ग्रामस्थांनी एकत्र येत वनराई बंधारा उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात पालकमंत्र्यांनी स्वतः सहभागी होत श्रमदान केले. जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधीही ग्रामस्थांसोबत कामात सहभागी झाल्याने लोकसहभागातून जलसंधारण करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळाले. पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते अडवून जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.
जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘घर तिथे शोषखड्डा’ अभियानालाही यावेळी चालना देण्यात आली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शोषखड्ड्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. घरगुती वापरानंतर निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे, पाण्याचे जमिनीत पुनर्भरण होण्यास मदत करणे आणि परिसरातील स्वच्छता व पर्यावरणाचे संवर्धन करणे या दृष्टीने शोषखड्डे महत्त्वाचे ठरतात. वनराई बंधारे आणि शोषखड्डे अशा विविध उपाययोजनांची सांगड घालून पाण्याचे संवर्धन करण्यावर या अभियानातून भर दिला जात आहे. स्थानिक परिस्थितीला अनुरूप आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य कामे लोकसहभागातून उभी राहिल्यास त्यांचे दीर्घकालीन परिणाम साधता येऊ शकतात.
मुंबई : “हलाल प्रमाणपत्रांच्या माध्यमातून गोळा होणारा पैसा हिंदू समाजाला दुर्बल करण्यासाठी आणि भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी वापरला जात आहे. ...
या वेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी वनराई बंधाऱ्याच्या उभारणीसाठी पुढाकार घेणाऱ्या महिला बचत गटांच्या सदस्यांचे आणि ग्रामस्थांचे आभार मानले. दुष्काळी परिस्थितीत ग्रामस्थांनी दाखविलेली एकजूट, श्रमदानाची तयारी आणि पाणी वाचविण्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. संकटाच्या काळात प्रशासन ग्रामस्थांच्या पाठीशी असून, अशा लोकाभिमुख उपक्रमांमधून ग्रामीण भागाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या दौऱ्याला ग्रामस्थांशी साधलेल्या अनौपचारिक संवादाचीही विशेष किनार लाभली. वनराई बंधाऱ्याच्या कामानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी गावातील ग्रामस्थांसोबत शेतात बसून भाजी आणि नाचणीची भाकरी खाल्ली. शेतातील बांधावर नाचणीची भाकरी खाताना ग्रामस्थांशी गप्पा रंगल्या. ग्रामीण जीवनातील साधेपणा अनुभवत पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्यातील सुसंवादातून विकासकामांना अधिक लोकाभिमुख दिशा मिळू शकते, याचे चित्र या प्रसंगातून पाहायला मिळाले.
या वेळी सभापती पर्वती गवस, जिल्हा परिषद सदस्य साक्षी तळवडेकर, रामा गवस, श्रेया धरणे, पंचायत समिती सदस्य स्नेहा गवस, सायली निंबाळकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, सरपंच अनिल शेटकर, उपसरपंच शाम नाईक, ग्रामविकास अधिकारी कृष्णा देसाई, पोलीस पाटील चंद्रशेखर सावंत, गावचे मानकरी केशव गवस यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी, महिला बचत गटांच्या सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.