मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या जुहू येथील बंगल्यामुळे चर्चेत आला आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) या बंगल्यात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई केली आहे. या बंगल्यावर मुंबई महानगरपालिकेनं (Brihanmumbai Municipal Corporation) हातोडा चालवला आहे. अजय देवगणच्या बंगल्याच्या आवारात सुरू असलेले सलून आणि स्पा सेंटरच्या बांधकामावर बंदी घालण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वतीने देण्यात आले होते. महापालिकेने अजय देवगण यांना 'काम थांबवण्याबाबत' (स्टॉप-वर्क) नोटीस बजावलेली होती. अखेर मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात आली असून बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात आला आहे.
अजय देवगणच्या बंगल्यावर BMC ची कारवाई का ?
अजय देवगणचा जुहू येथील बंगला कपोल को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी परिसरात आहे. या मालमत्तेत अंतर्गत बदल, विभाजनाच्या भिंती, खिडक्या आणि इतर बांधकामे करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. या कामांसाठी आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत की नाहीत, यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले. सोसायटीकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या के-वेस्ट विभागाने संबंधित बांधकामाची दखल घेतली. त्यानंतर बांधकाम थांबवण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, नोटिशीनंतरही काम सुरू राहिल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यानंतर महापालिकेने बांधकामाच्या काही भागावर कारवाई केली आहे.
10 सप्टेंबर रोजी बजावली होती नोटीस
या प्रकरणात मुंबई महापालिकेने 10 सप्टेंबर 2026 रोजी मुंबई महानगरपालिका कायद्याच्या कलम 354A अंतर्गत नोटीस बजावली. संबंधित बांधकाम तातडीने थांबवावे आणि आवश्यक कागदपत्रे व परवानग्या सादर कराव्यात, असे निर्देश या नोटिशीत देण्यात आल्याची माहिती आहे. बांधकामासाठी आवश्यक मंजुरी नसल्याचा आरोप या प्रकरणात महत्त्वाचा ठरत आहे.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका ग्रीन बाँडस् सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, क्षार निर्मूलन प्रकल्प यासारख्या शाश्वत पायाभूत सुविधा ...
बंगल्यात सलून आणि स्पा सेंटर सुरू करण्याची तयारी ?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय देवगणचा हा बंगला व्यावसायिक कारणासाठी भाड्याने देण्यात आला आहे. या ठिकाणी सलून आणि स्पा सेंटर सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. फ्लोरियन ह्युरेल सलून प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ही मालमत्ता पाच वर्षांसाठी भाड्याने देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या भाडेकराराचे एकूण मूल्य 10.61 कोटी रुपये आहे.
सोसायटीतील रहिवाशांचा व्यावसायिक वापराला विरोध?
या प्रकरणात केवळ बांधकामाचा मुद्दा नसून, बंगल्याच्या व्यावसायिक वापराबाबतही आक्षेप घेतल्याचे वृत्त आहे. सलून आणि स्पा सेंटर सुरू झाल्यास परिसरात लोकांची वर्दळ वाढू शकते. त्यामुळे पार्किंगची समस्या, वाहतूक कोंडी, सुरक्षितता आणि आवाज यांसारख्या अडचणी निर्माण होण्याची भीती काही रहिवाशांनी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, अजय देवगणच्या टीमने हे आरोप फेटाळून लावले आहे. मालमत्तेच्या प्रस्तावित वापरासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या संबंधित प्राधिकरणांकडून घेतल्या गेल्याचं त्यांनी स्पष्ट केले. असं असलं तरी, या विषयावर खुद्द अभिनेत्याकडून कोणतंही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
एकीकडे चित्रपटांमुळे चर्चेत असलेला अजय देवगण आता जुहू येथील बंगल्याशी संबंधित महापालिका कारवाईमुळेही चर्चेचा विषय ठरत आहे.