Saturday, October 17, 2026

Hong Kong Sixes 2026 : कृणाल पांड्याकडे भारताची धुरा, 'हा' स्टार खेळाडू तब्बल 4 वर्षांनंतर थेट राष्ट्रीय संघात परतला!

हाँगकाँग सिक्सर्स 2026 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, अष्टपैलू कृणाल पांड्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. दरम्यान, अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या अचानक राष्ट्रीय संघात पुनर्वसनामुळे तो या स्पर्धेला मुकणार आहे.

हाँगकाँग सिक्सर्स 2026 (Hong Kong Sixes 2026) क्रिकेट स्पर्धेबाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आगामी 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या रोमांचक स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. आयपीएलचा दांडगा अनुभव असलेल्या तडाखेबंद खेळाडूंचा समावेश असलेला हा संघ या वेगवान फॉरमॅटमध्ये भारताला विजय मिळवून देण्यासाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीला भुवनेश्वर कुमार भारतीय संघाचे नेतृत्व करणार असल्याची चर्चा होती. मात्र, न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या टी-20 संघात निवड झाल्यामुळे भुवनेश्वर कुमारला हाँगकाँग सिक्सर्समधून माघार घ्यावी लागली आहे. तब्बल चार वर्षांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारसाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. 22 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यामुळे तो या वेगवान स्पर्धेला मुकणार आहे.

क्रिकेट हाँगकाँग, चीनचे वाणिज्य आणि विपणन संचालक अनुराग भटनागर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "हाँगकाँग सिक्सेस 2026 मध्ये भुवनेश्वर कुमारची उणीव निश्चितच भासेल. परंतु, चार वर्षांनंतर त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होत असल्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही त्याला न्यूझीलंड दौऱ्यासाठी आणि भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा देतो."भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत आता कृणाल पांड्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली असून, संघाची भिस्त आता पूर्णपणे आयपीएल गाजवलेल्या खेळाडूंवर असेल.

हाँगकाँग सिक्सेससाठी असा आहे भारतीय संघ: कृणाल पांड्या (कर्णधार), शशांक सिंग, राहुल तेवतिया, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, टी. नटराजन आणि कुलवंत खेजरोलिया.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >