Saturday, October 17, 2026

Nashik : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड ! अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाकडून फेटाळला

Nashik : राज्यभर चर्चेत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणात नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी अमोल रमेश कुलकर्णी याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती माधव जे. जामदार यांनी हा आदेश दिला.

काय आहे शालार्थ आयडी घोटाळा ?

नाशिक विभागातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. अभियोजन पक्षाच्या म्हणण्यानुसार, २०२२ ते २०२४ या कालावधीत झालेल्या काही नियुक्त्या त्यापूर्वीच्या वर्षांत झाल्याचे दाखवण्यात आले. यासाठी कथित बनावट कागदपत्रांचा वापर करून शासनाकडून वेतनाची थकबाकी मिळवण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने एकूण ९६ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचा उल्लेख न्यायालयाच्या आदेशात करण्यात आला आहे.

१७ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत गंभीर आरोप

अमोल कुलकर्णीच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात असलेल्या अंतुर्ली येथील एम. एफ. तराळ विद्यालयाशी संबंधित प्रकरणाचाही विचार करण्यात आला. अभियोजन पक्षाच्या आरोपानुसार, या विद्यालयातील १७ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या २०२४ मध्ये झाल्या होत्या. मात्र, त्या नियुक्त्या २०१४ ते २०१७ या कालावधीत झाल्याचे दर्शवण्यात आल्याचा आरोप आहे. या कथित कागदपत्रांच्या आधारे दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेची वेतन थकबाकी मागण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

तत्कालीन मुख्याध्यापकांच्या जबाबात काय ?

तपासादरम्यान विद्यालयाचे तत्कालीन मुख्याध्यापक रामदास एस. पाटील यांनी दिलेला जबाबही न्यायालयासमोर मांडण्यात आला. या जबाबानुसार, अमोल कुलकर्णी याने नियुक्तीच्या प्रस्तावांशी संबंधित कागदपत्रांवर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संबंधित कालावधीत आपण मुख्याध्यापकपदावर कार्यरत नव्हतो, असे सांगत त्यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, संबंधित शैक्षणिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने काम करताना नियुक्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करण्यात आरोपीची भूमिका असल्याची बाब तपासात समोर आल्याचे न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे.

आरोपीच्या बाजूने काय युक्तिवाद करण्यात आला ?

अमोल कुलकर्णीच्या वतीने युक्तिवाद करताना तो शिपाई पदावर कार्यरत असून, वरिष्ठांच्या सूचनेनुसार काम करत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, उपलब्ध कागदपत्रे, साक्षीदारांचे जबाब आणि तपासात समोर आलेली आरोपीची कथित भूमिका लक्षात घेता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी पुरेसा आधार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानुसार न्यायमूर्ती माधव जे. जामदार यांनी अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

यापूर्वीही एका आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात यापूर्वी रामदास तराळ याचाही अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे या प्रकरणातील न्यायालयीन घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, कथित बनावट कागदपत्रे आणि शासनाकडून वेतन थकबाकीच्या स्वरूपात निधी मिळवण्याच्या आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणातील आरोपांबाबत पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >