Nashik Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि ३१ ऑक्टोबर रोजी होणारा राष्ट्रपतींचा नाशिक दौरा लक्षात घेता शहर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासह संशयास्पद आणि बेकायदेशीर हालचालींना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी तपासणी व कारवाई केली जात आहे. गेल्या आठवड्यापासून गुन्हे शाखा, विशेष शाखा आणि स्थानिक पोलीस ठाण्यांची पथके सक्रिय झाली आहेत.
घरमालक आणि भाडेकरूंवर पोलिसांची कारवाई
सुरक्षा मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात म्हसरूळ आणि सातपूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. घरमालकांनी त्यांच्या घरी राहणाऱ्या भाडेकरूंची आवश्यक माहिती संबंधित पोलीस ठाण्यात सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांचे पालन न करणाऱ्या घरमालक आणि संबंधित व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले. शहरात वास्तव्यास असलेल्या व्यक्तींची माहिती अद्ययावत ठेवणे आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
पाच हॉटेल आणि लॉज मालकांविरोधात गुन्हे
यानंतर पोलिसांनी मुंबई नाका आणि द्वारका परिसरातील हॉटेल व लॉजची तपासणी केली. या कारवाईदरम्यान पाच हॉटेल आणि लॉज मालकांनी त्यांच्या आस्थापनांमध्ये वास्तव्यास आलेल्या परदेशी नागरिकांची तसेच इतर पर्यटकांची आवश्यक माहिती वेळेत नोंदवली नसल्याचे समोर आले. सी-फॉर्म किंवा लॉगबुकसंदर्भातील नियमांचे पालन करण्याबाबत नोटीस देऊनही दुर्लक्ष केल्याने संबंधित मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
Nashik : राज्यभर चर्चेत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणात नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल ...
पाच वाहन बाजार मालकांवरही गुन्हे दाखल
पोलिसांच्या विशेष मोहिमेच्या पुढील टप्प्यात शहरातील वाहन खरेदी-विक्री व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यात आले. जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीदरम्यान ग्राहकांची ओळख, आवश्यक कागदपत्रे आणि वाहन नोंदणी यांची योग्य पडताळणी होणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत त्रुटी राहिल्यास गैरव्यवहार किंवा बेकायदेशीर कृत्यांसाठी वाहनांचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर मुंबई नाका पोलिसांनी पाच वाहन बाजार मालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. वाहनांच्या व्यवहारांमध्ये नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक नोंदी व्यवस्थित ठेवल्या जाव्यात, यासाठी ही कारवाई करण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके सक्रिय
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत आणि किशोर काळे, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके काम करत आहेत. गुन्हे शाखा, विशेष शाखा, गोपनीय शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
आगामी काळात तपासणी अधिक तीव्र होणार
शहरातील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलिसांकडून पुढील काळात इतर आस्थापना, दुकाने आणि संशयास्पद ठिकाणांचीही तपासणी केली जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची सुरक्षा त्रुटी राहू नये, यासाठी यंत्रणा सतर्क झाली आहे. घरमालक, हॉटेल व्यावसायिक, लॉज चालक आणि वाहन खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी आवश्यक नोंदी व कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत आणि कायदेशीर नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.