टेलिव्हिजन विश्वाची 'क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि आपल्या बोल्ड व यशस्वी कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेल्या निर्मात्या-दिग्दर्शिका एकता कपूर (Ekta Kapoor) हिने अलीकडेच एका मुलाखतीत बॉलिवूड आणि मनोरंजमजुगतातील एका संवेदनशील विषयावर रोखठोक भाष्य केले आहे. आपल्या संस्कृतीबद्दल उघडपणे बोलणाऱ्या एकताने, मनोरंजनसृष्टीत आजही हिंदू परंपरा आणि प्रथांच्या पालनाबाबत एक अघोषित अस्वस्थता किंवा पूर्वाग्रह असल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रसिद्ध पॉडकास्ट होस्ट रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या तरुणपणात आलेल्या कटू अनुभवांना उजाळा दिला आहे.
काय म्हणाली एकता कपूर ? (Ekta Kapoor)
मुलाखतीदरम्यान एकताने तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द वन' या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटाबद्दल चर्चा केली. यादरम्यान तिने भारतीय चित्रपटसृष्टीच्या मानसिकतेवर बोट ठेवले. ती म्हणाली की, आजकाल पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करणं फॅशनेबल मानलं जातं, पण जेव्हा आपल्या स्वतःच्या पौराणिक कथा किंवा दंतकथांवर आधारित विषय मांडण्याची वेळ येते, तेव्हा इंडस्ट्रीत एका वेगळ्या प्रकारची भीती किंवा संकोच पाहायला मिळतो. "आपल्याला हॉलीवूडचे ॲनिमेशन किंवा इतर गोष्टी चालतात, पण आपल्याच संस्कृतीशी जोडलेले विषय आणताना काही लोक संकोचतात. चित्रपटसृष्टीचा हा दृष्टिकोन कुठेतरी 'हिंदूफोबिया'कडे झुकलेला आहे," असा थेट आरोप एकताने केला.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विद्याविहार रेल्वे स्थानकावरील एल.बी.एस. मार्ग व आर.सी. मार्ग यांना जोडणाऱ्या उड्डाण पुलाच्या बांधकामाचा खर्च तब्बल १० कोटी ...
तरुणपणातील तो किस्सा आणि टीकाकारांना खडा सवाल
आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना एकताने सांगितले की, ती लहानपणापासूनच आपल्या श्रद्धांचे आणि परंपरांचे पालन करत आली आहे. मात्र, एकेकाळी तिच्या या स्वभावामुळे तिला लोकांच्या टोमण्यांना सामोरे जावे लागले होते. "मी तरुण असताना कपाळावर टिळा लावायचे आणि हातावर धागा बांधायचे. यावरून एका व्यक्तीने मला कपड्यांवरून आणि माझ्या जीवनशैलीवरून हिणवले होते. माझी ही स्टाईल अतिशय विचित्र असल्याची टीका त्याने केली होती," असा गौप्यस्फोट तिने केला. पुढे संताप व्यक्त करत तिने सवाल केला की, "कपाळावर टिळा लावणं आणि हातात धागा बांधणं ही काही विचित्र फॅशन आहे का? आपल्या धर्माचं आणि परंपरांचं पालन करणं ही कधीपासून समस्या बनली?"
मंदिरापासून क्लबपर्यंतचा प्रवास आणि आधुनिकता
फक्त परंपराच नव्हे, तर आधुनिक जीवनशैली आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी एकत्र कशा सांभाळायच्या, याचे एक सुंदर उदाहरणही तिने दिले. तिने आपल्या एका मजेशीर आणि खऱ्याखुऱ्या प्रसंगाचा उल्लेख करताना सांगितले की, ती एकदा थेट मंदिरातून दर्शन घेऊन एका क्लबमध्ये गेली होती. तिथे उपस्थित असलेल्या काहींनी तिला आश्चर्याने विचारले की, "तू थेट मंदिरातून आली आहेस का?" यावर तिने अत्यंत आत्मविश्वासाने उत्तर दिले होते की, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. मंदिर ही केवळ इच्छापूर्ती किंवा सकारात्मक ऊर्जा मिळवण्याची जागा आहे, आणि धार्मिक आस्थेचा अर्थ आधुनिक आयुष्य जगण्यापासून दूर राहणे असा होत नाही, असे मत तिने व्यक्त केले. एकता कपूरच्या या रोखठोक आणि स्पष्टवक्त्या भूमिकेमुळे सध्या मनोरंजन विश्वात नवीनच चर्चेला उधाण आले असून, तिच्या या वक्तव्याचे संमिश्र पडसाद उमटत आहेत.