Friday, October 16, 2026

Pune Weather : उकाड्यापाठोपाठ पुण्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

आग्नेय अरबी समुद्र आणि लगतच्या किनारपट्टीवरील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल झाला आहे. वाढत्या उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना आता विजांच्या कडकडाटासह पावसाचा सामना करावा लागणार असून, हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वाढलेली ऑक्टोबर हीट आणि प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक, तसेच सावध करणारी बातमी समोर आली आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच हवामान विभागाने अचानक हवामानात बदल झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. आज पुणे जिल्ह्याह अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, हवामान खात्याने नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. आग्नेय अरबी समुद्र आणि तमिळनाडू-आंध्र प्रदेश किनाऱ्यालगत निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या (Cyclonic Circulation) स्थितीमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदल झाला आहे. यामुळे पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि दक्षिण मराठवाड्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

पुणे शहरात आणि जिल्ह्यात आज काही ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह तुरळक स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, एकीकडे पाऊस पडत असला तरी कमाल तापमानातील चढ-उतारामुळे दुपारी उन्हाचा चटका आणि दमट हवामानामुळे पुणेकरांचा उकाडा कायम राहणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या या अंदाजामुळे शेतकरी वर्गात संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

हवामानातील बदलांमुळे राज्यभरातील अनेक जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तसेच पुणे, रत्नागिरी, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. याउलट, मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत उन्हाचा चटका वाढून अत्यंत दमट हवामान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आवाहन

वादळी वाऱ्यादरम्यान विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, तसेच शेतकऱ्यांनी काढणीला आलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >