
Wasim Jaffer : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या नव्या मुख्य निवडकर्त्याच्या नियुक्तीची चर्चा रंगली आहे. भारताकडून 31 कसोटी सामने खेळलेल्या अनुभवी माजी सलामीवीर वसीम जाफर यांचे नाव या पदासाठी चर्चेत आले आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभवामुळे या घडामोडीकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, जाफर यांची मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती झाल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पुढील निर्णय काय घेते, तसेच निवड प्रक्रियेत कोणाची वर्णी लागते, याबाबत उत्सुकता कायम आहे.
वसीम जाफर यांचा मुख्य निवडकर्ता पदासाठी अर्ज
भारताचे माजी सलामीवीर वसीम जाफर यांनी भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या वरिष्ठ निवड समितीतील रिक्त पदासाठी अर्ज केल्याची पुष्टी केली आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना जाफर यांनी आपण या पदासाठी अर्ज केल्याचे सांगितले. माजी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे.
31 कसोटी सामने आणि दमदार प्रथम श्रेणी कारकीर्द
वसीम जाफर यांनी भारताकडून 31 कसोटी सामने खेळताना 1,944 धावा केल्या. त्यांच्या नावावर पाच कसोटी शतके आहेत. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 260 प्रथम श्रेणी सामन्यांत त्यांनी 19,410 धावा आणि 57 शतके झळकावली. त्यामुळे भारतीय क्रिकेटमधील त्यांचा अनुभव निवड समितीच्या भूमिकेसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघांमधील पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला. कर्णधार स्मृती मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम ...
प्रज्ञान ओझा यांच्यासमोर कोणते आव्हान?
अजित आगरकर यांचा कार्यकाळ 4 ऑक्टोबर 2026 रोजी संपल्यानंतर माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा अंतरिम मुख्य निवडकर्ता म्हणून काम पाहत आहेत. ओझा यांनी भारतासाठी 24 कसोटी सामने खेळले आहेत. दुसरीकडे, जाफर यांनी 31 कसोटी सामने खेळल्यामुळे त्यांची निवड झाल्यास मुख्य निवडकर्ता पदासाठी त्यांचा अनुभव महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) ओझा यांना कायम ठेवण्याची इच्छा असल्याचेही वृत्त आहे.
अंतिम निर्णय कोण घेणार?
मुख्य निवडकर्त्याच्या नियुक्तीबाबत क्रिकेट सल्लागार समितीची भूमिका महत्त्वाची असेल. निवड समितीचे काम केवळ संघ निवडण्यापुरते मर्यादित नसून, नव्या खेळाडूंची गुणवत्ता ओळखणे, देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीचे मूल्यमापन करणे आणि भारतीय संघासाठी सक्षम पर्याय तयार करणे हेही आहे.
दरम्यान, वसीम जाफर यांची नियुक्ती अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेली नाही. त्यामुळे भारतीय संघाच्या नव्या मुख्य निवडकर्त्याबाबत BCCI काय निर्णय घेते, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.





