Saturday, October 17, 2026

निवडणूक आयुक्तांविरोधातील मोर्चात टीपू सुलतानच्या घोषणा कशासाठी? - मंत्री नितेश राणेंचा सवाल

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे काढण्यात आलेल्या मोर्चात ‘टीपू सुलतान’ आणि ‘हमें चाहिए आजादी, टीपू वाली आजादी’ अशा घोषणा देण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. याबाबत तीव्र आक्षेप नोंदवत राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी, निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीचा आणि टीपू सुलतानच्या घोषणांचा संबंध काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. देशात इस्लामी राष्ट्र आणि शरिया कायदा आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मालेगावमधील आंदोलनाचा संदर्भ देताना राणे म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आंदोलन होत असताना टीपू सुलतानच्या घोषणा देण्याचे कारण काय, हे स्पष्ट झाले पाहिजे. टीपू सुलतानने हजारो हिंदूंची हत्या केली आणि धर्मांतर घडवून आणले. अशा व्यक्तीचा गौरव करणे देशविरोधी आहे. संबंधित आंदोलनकर्त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान मान्य नसून देशात शरिया कायदा आणायचा आहे. देशात ‘गज्वा-ए-हिंद’च्या माध्यमातून इस्लामी राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

टीपू सुलतानचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जात असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्याबाबत विचारले असता मंत्री राणे म्हणाले, वडेट्टीवार यांचे शालेय शिक्षण कुठे झाले, याची तपासणी करावी लागेल, त्यानंतरच त्यांच्या विधानाला उत्तर देऊ, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान उबाठा गटाच्या दसरा मेळाव्याबाबत विचारले असता मंत्री राणे यांनी बोचरी टीका केली. ते म्हणाले, पूर्वी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाची भूमिका मांडत असत; मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या विचारांत मोठा बदल झाला आहे. यंदाचा दसरा मेळावा संविधान वाचवण्याच्या भूमिकेतून होणार असल्याचे ते सांगत असले, तरी उमर खालिदच्या समर्थकांची भाषा आणि ठाकरे गटाची भाषा एकसारखी झाली आहे. त्यामुळे त्यांनी आता बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राऐवजी मोहम्मद अली जिना आणि उमर खालिद यांची छायाचित्रे लावावीत, असा टोला राणे यांनी लगावला.

नेहा गोरा उमर खालिदला गुरू मानतात, तर अभिजीत दीपके त्याला बॉस मानतो. अभिजीत दीपकेला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी स्वतः मान्य केले आहे. त्यामुळे उबाठाच्या दसरा मेळाव्यात ‘सर तन से जुदा’च्या घोषणा ऐकू आल्यास आश्चर्य वाटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात हिंदुत्वाची भूमिका मांडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या जागी आता जिना यांच्या विचारांची चर्चा होईल, अशी टीका देखील मंत्री राणे यांनी केली. आंदोलकांच्या तोंडी पाकिस्तानची भाषा

निवडणूक आयुक्तांविरोधातील आंदोलनांमधून सरकार बदलण्याची मागणी उघडपणे केली जात आहे. पाकिस्तानची भाषा बोलली जात आहे. त्यामुळे आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई सरकारकडून सुरू असून, पाकिस्तानची भाषा किंवा पाकिस्तानची भूमिका देशात मांडू देणार नाही, असे मंत्री नितेश राणे म्हणाले. एसआयआरच्या माध्यमातून मतदारयाद्यांमधील बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांची नावे वगळली जात असतील, तर त्याचे समर्थन केले पाहिजे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अशा बोगस मतदारांचे प्रकार समोर आले. त्यामुळे बांगलादेशी आणि रोहिंग्यांना महाराष्ट्रात, मुंबईत किंवा देशात येऊन मतदानाचा अधिकार मिळू नये, असे ते म्हणाले. विवेकानंद पाटलांनी रोहित पवारांचे मार्केट संपवले

अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपने अर्थखाते चोरून घेतले. भाजपने हावरटासारखे अर्थखाते घेतले, अद्याप ते दिलेले नाही. ते देणार पण नाहीत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, अशी टीका शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली. त्याबाबत विचारले असता मंत्री नितेश राणे म्हणाले, रोहित पवारांनी आता कमी बोलावे. काण, विवेकानंद पाटलांनी त्यांचे मार्केट संपवले. रोहित पवारांनी आता विवेकानंद पाटलांकडून क्लास घ्यावेत. किंबहुना संघाच्या शाखेत यावे, त्यांच्या विचारांत परिवर्तन होईल, असा टोलाही राणे यांनी लगावला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >