भरधाव कारची भाविकांना धडक
मिळालेल्या माहितीनुसार, नांदुरी येथील मुख्य रस्त्यावर रात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सप्तशृंगगडाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची या परिसरात वर्दळ होती. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या कारने भाविक आणि बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
या अपघातात वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षकांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातानंतर कारचालक फरार
अपघात घडल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या घटनेमुळे नांदुरी परिसरात खळबळ उडाली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार
अपघातातील जखमी भाविक आणि पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
फरार कारचालकाचा शोध सुरू
घटनेची माहिती मिळताच कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून फरार कारचालकाचा शोध सुरू आहे. अपघात नेमका कसा घडला, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.