Sunday, October 18, 2026

Mumbai Footpath Encroachment : पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे थेट आदेश

पदपथांवरील अशा अतिक्रमणांना आळा घालून ते पादचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी मोकळे, सुरक्षित व अडथळामुक्त ठेवावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत.

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

पदपथांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर होता कामा नये, काटेकोर दक्षता घ्यावी. पदपथांवर वाहने उभी करून दुरुस्ती करणाऱ्या गॅरेज व्यावसायिकांवर तसेच पदपथ व रस्त्यालगतच्या जागेचा वाहनांच्या खरेदी-विक्रीसाठी अनधिकृत वापर करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी. पदपथांवरील अशा अतिक्रमणांना आळा घालून ते पादचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी मोकळे, सुरक्षित व अडथळामुक्त ठेवावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांची मासिक आढावा बैठक शनिवारी १७ ऑक्‍टोबर २०२६ रोजी वरळी येथील कमांड अँड कंट्रोल सेंटर येथे पार पडली. या आढावा घेताना आयुक्तांनी हे निर्देश दिले आहेत. यावेळी बोलतांना आयुक्तांनी, अतिक्रमणे हटवल्यानंतर पदपथांची दुरुस्ती व सौंदर्यीकरण करावे असे निर्देश दिले. भिडे म्हणाल्या की, अतिक्रमणे हटवल्यानंतर पदपथांची तातडीने दुरुस्ती करून ते सुस्थितीत, स्वच्छ व सुरक्षित करावेत. पदपथांचे सौंदर्यीकरण करताना आकर्षक व एकसंध रचना, सुयोग्य दृश्यात्मकता आणि सुटसुटीत मांडणी यांना प्राधान्य द्यावे. तसेच, पदपथ पादचाऱ्यांसाठी अडथळामुक्त, सहज वापरण्यायोग्य आणि परिसराच्या सौंदर्यात भर घालणारे असतील, याची दक्षता घ्यावी.

अधिकृत दुकाने व स्टॉल्सच्या पुनर्वसनात क्षेत्रफळाची पडताळणी करावी

पदपथांवरील अधिकृत दुकाने व स्टॉल्सचे स्थलांतर किंवा पुनर्वसन करताना त्यांच्या मूळ जागेच्या क्षेत्रफळाचे अचूक मोजमाप तपासावे. तसेच, अधिकृत नोंदी व मंजूर परवानग्यांची पडताळणी करून नियमानुसार पुनर्वसनाची कार्यवाही करावी, जेणेकरून अनधिकृत विस्ताराला आळा बसेल आणि पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे राहतील,अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

अनधिकृत रॅम्प हटवून पदपथांची मूळ रचना पुनर्स्थापित करा

काही गृहनिर्माण संस्थांनी पदपथांमध्ये अनधिकृत बदल करून वाहनांच्या ये-जा करण्यासाठी रॅम्पची निर्मिती केली आहे. अशा प्रकरणांची पाहणी करून संबंधित संस्थांना नियमानुसार नोटिसा बजावाव्यात आणि अनधिकृत रॅम्प हटविण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी. तसेच, पदपथांची मूळ रचना पुनर्स्थापित करून ते सुस्थितीत, सुरक्षित व पादचाऱ्यांसाठी अडथळामुक्त राहतील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश अश्विनी भिडे यांनी दिले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >