बीड जिल्ह्यातील पंढरपूर खामगाव पालखी मार्गावर भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी झालेल्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. तुळजा भवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांना घेऊन जाणारी कार राज्य परिवहन बसला धडकली. रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात माजलगाव तालुक्यात शिंदेवाडी फाट्याजवळ घडला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी रस्ता बांधणीसाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव येथील एक कुटुंब कारने तुळजापूरला जात होते. शिंदेवाडी जंक्शनजवळ कार आणि बसची धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की कारचे चक्क तुकडे झाले. बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले. कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे महामार्गावर काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. आपघातस्थळी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अपघातामुळे संतप्त झालेल्या शिंदेवाडीतील गावकऱ्यांनी महामार्ग अडवला. शिंदेवाडी जंक्शनजवळील एका रोड जंपमुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली होती.