
मुंबई: मोबाईलवर इंटरनेटचा वापर न करता केवळ कॉलिंग आणि मेसेजसाठी फोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एअरटेलने तीन नवे प्रीपेड प्लॅन बाजारात आणले आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नव्या निर्देशानुसार, डेटा नसलेले ‘व्हॉइस आणि एसएमएस ओन्ली’ प्लॅन सादर करणारी एअरटेल ही देशातील पहिली दूरसंचार कंपनी ठरली आहे. एअरटेलने 185 रुपये, 203 रुपये आणि 206 रुपये किमतीचे हे तीन प्लॅन उपलब्ध केले आहेत. ग्राहकांना रिचार्जमध्ये कशी सुविधा मिळेल, जाणून घेऊया...
प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्या सुविधा मिळणार आहेत?
- कॉलिंग: कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग.
- एसएमएस: प्रत्येक प्लॅनमध्ये ३०० मोफत एसएमएस.
- अतिरिक्त सुविधा: हॅलो ट्यून्सची मोफत सुविधा (कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय दर महिन्याला पसंतीची कॉलर ट्यून सेट करता येईल).
- डेटा: या प्लॅनमध्ये मोबाईल डेटा किंवा इंटरनेटची सुविधा मिळणार नाही.
प्लॅनची वैधता
- १८५ रुपये: २८ दिवसांची वैधता.
- २०३ रुपये: ३० दिवसांची वैधता.
- २०६ रुपये: संपूर्ण कॅलेंडर महिन्यासाठी वैध.
हे तिन्ही प्लॅन एअरटेल थँक्स ॲप आणि कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत. मात्र, या नव्या प्लॅनबाबत एअरटेलकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.
कोणासाठी फायदेशीर?
अनेक ग्राहक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि फीचर फोन वापरणारे, मोबाईलचा वापर प्रामुख्याने बोलण्यासाठी किंवा मेसेजसाठी करतात. यापूर्वी त्यांना गरज नसलेल्या डेटासाठीही पैसे खर्च करावे लागत होते. या ग्राहकांचे बजेट आणि गरज लक्षात घेऊन हे प्लॅन आणले गेल्याचे मानले जात आहे.
जिओचे आधीपासूनच लाँग-टर्म व्हॉइस प्लॅन्स
दुसरीकडे, रिलायन्स जिओकडूनही व्हॉइस-ओन्ली प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स दिले जातात, ज्यामध्ये अधिक कालावधीच्या वैधतेवर भर असतो. जिओच्या ४४८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची आणि १,७४८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३३६ दिवसांची वैधता मिळते. या दोन्ही प्लॅन्समध्येही अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस मिळतात, परंतु मोबाईल डेटा दिला जात नाही.





