दिमापूर : देशांतर्गत क्रिकेटच्या इतिहासात तब्बल 78 वर्षांनंतर एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. रणजी ट्रॉफी 2025-26 च्या प्लेट सामन्यात मिझोरमचा फलंदाज चिन्मय सुतारने तुफानी फलंदाजी करत 400 धावांची ऐतिहासिक खेळी साकारली आहे. या ऐतिहासिक कामगिरीसह चिन्मय सुतार रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एकाच डावात 400 धावा करणारा केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी 1948 मध्ये महाराष्ट्राच्या बी. बी. निंबाळकर यांनी काठियावाड विरुद्ध नाबाद 443 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. या दमदार कामगिरीमुळे चिन्मयचे सर्वत्र कौतुक होत आहे.
1948 चा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर चिन्मय
सोमवारी दिमापूर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात नागालँडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना मिझोरमने आपल्या पहिल्या डावात 581/9 धावांवर डाव घोषित केला. चिन्मय सुतारने या डावात 46 चौकार आणि 7 षटकारांची आतषबाजी करत 400 धावांचा महापूर आणला. रणजी ट्रॉफीच्या इतिहासात आता बी. बी. निंबाळकर यांच्या नाबाद 443 धावांच्या सर्वकालीन विक्रमापाठोपाठ चिन्मय सुतारची ही दुसरी सर्वोत्कृष्ट व्यक्तिगत खेळी ठरली आहे. या यादीत भारताचा माजी सलामीवीर पृथ्वी शहा (379 धावा) तिसऱ्या स्थानावर, संजय मांजरेकर (366 धावा) चौथ्या स्थानावर आणि एम. व्ही. श्रीधर (344 धावा) पाचव्या स्थानावर आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोमवारी प्रज्ञान ओझा यांची पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली, तर अजित आगरकर यांच्यानंतर रमेश पोवार ...
जागतिक प्रथम श्रेणी क्रिकेटमधील एलिट क्लबमध्ये प्रवेश
केवळ रणजी ट्रॉफीच नव्हे, तर जागतिक प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात 400 धावा करणारा चिन्मय हा जगातील 10 वा फलंदाज ठरला आहे. या एलिट यादीत सर डॉन ब्रॅडमन आणि ब्रायन लारा (501* धावा) यांसारख्या जागतिक क्रिकेट दिग्गजांची नावे समाविष्ट आहेत. मिझोरमच्या या डावात जेहू अँडर्सननेही 69 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. चिन्मयसाठी हा रणजी हंगाम अत्यंत स्वप्नवत ठरला असून, त्याने आपल्या उत्कृष्ट जिद्दीच्या जोरावर क्रिकेट जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.