
Mumbai Fire News: मुंबईतील दादर पश्चिम येथे शिवसेना भवनसमोर असलेल्या कोहिनूर स्क्वेअर इमारतीतील हॉटेलच्या किचनमध्ये सोमवारी (19 ऑक्टोबर) सकाळी आग लागल्याची घटना घडली. सकाळी 9:18 वाजता आगीची माहिती मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर सकाळी 9:25 वाजता अग्निशमन दलाने आगीला ‘लेव्हल 1’ घोषित केले.
View this post on Instagram
पहिल्या मजल्यावरील किचनमध्ये आग
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोहिनूर स्क्वेअर या तळमजला आणि वरचे 50 मजले असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील हॉटेलच्या किचनपुरती आग मर्यादित होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, बेस्ट, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), आरोग्य विभाग (MOH), 108 रुग्णवाहिका सेवा आणि संबंधित वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले.
जीवितहानीची माहिती नाही
आगीच्या घटनेत कोणाला दुखापत झाल्याची माहिती प्राथमिक अहवालात देण्यात आलेली नाही. आग विझवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून कार्यवाही करण्यात आली.
आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.






