Monday, October 19, 2026

Navi Mumbai: नवी मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, कोपरखैरणे- महापे लिंक रोड उभारणार

Kopar Khairane- Mahape Link Road: नवी मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. येत्या दिवसांमध्ये नवी मुंबई शहरात लिंक रोड उभारला जाणार आहे.

नवी मुंबई: नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई आणि ठाण्यानंतर आता नवी मुंबईतही लोकसंख्या वाढताना दिसत आहे. विकेंडच्या वेळी किंवा सणासुदीच्या दिवसांमध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहनांची लांबच लांब रांग पाहायला मिळते. सतत होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, आता नवी मुंबई महानगर पालिकेने लिंक रोड बनवण्याचा निर्णय घेतला आहे. कोपरखैरणे ते महापे या परिसरामध्ये 431 मीटरचा उड्डाणपूल बनवण्यात येणार आहे. या उड्डाणपूलासाठी अंदाजे नवी मुंबई महानगर पालिकेला 24 कोटी रूपये इतका खर्च येण्याची शक्यता आहे.

8.5 मीटर रुंद असणाऱ्या रस्त्यामुळे कोपरखैरानेमधील सध्या भुयारी मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे येणारा ताण कमी होण्याची आणि शहरातील कनेक्टिव्हिटी सुधारण्याची अपेक्षा आहे. भविष्यात ऐरोली- घणसोली उन्नत मार्गाकडे जाणाऱ्या वाहनांसाठीही हा उड्डाणपूल महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. नवी मुंबई महानगर पालिकेचे शहर अभियंता शिरीष आरडवाड यांनी सांगितले की, कोपरखैराणे- महापे लिंक रोड प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या आणि त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला आहे. कामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. या नवीन लिंक रोडमुळे नवी मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत करेल.

कोपरखैरानेच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अनेकदा गैरसोयींचा सामना करावा लागतो, कारण बस आणि अवजड वाहने सध्याच्या भुयारी मार्गातून जाऊ शकत नाहीत. या एकेरी मार्गामुळे वाहतूक मंदावते आणि विशेषतः गर्दीच्या वेळी शहरात वाहतूक कोंडी वाढते. परिणामी, अनेक वाहनचालकांना कोपरखैराणेला पोहोचण्यासाठी कोपरी किंवा घणसोलीमार्गे पाच ते सहा किलोमीटरचा वळसा घ्यावा लागतो. इतरांना महापे उड्डाणपुलाला वळसा घालून लांबचा मार्गाचा पर्याय अवलंबवावा लागतो, ज्यामुळे अतिरिक्त इंधन, वेळेचा अपव्यय आणि गैरसोय होते. ठाणे-बेलापूर रस्ता पूर्वेकडील एमआयडीसी इंडस्ट्रीयल रोडला आणि पश्चिमेकडील रस्ता सिडको- विकसित निवासी भागांपासून वेगळे करतो.

दोन्ही बाजूंना जोडण्यासाठी अनेक उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधण्यात आले आहेत, परंतु कोपरखैराणे- महापे पट्ट्यातील प्रवाशांसाठी सध्याचे रस्ते जाळे आव्हानांचे कारण ठरत आहे. दरम्यान, वाहनचालकांनी कोपरखैराणे- महापे उड्डाणपुलावरून बाहेर पडण्यासाठी एका स्वतंत्र मार्गाची मागणी केली आहे. प्रस्तावित जोड रस्त्यामुळे कोपरखैराणे ते उड्डाण पुलापर्यंत जोडणी मिळणार असली तरी, उड्डाणपुलावरून घणसोली आणि कोपरखैराणेच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी सोयीस्कर बाहेर पडण्याच्या मार्गाचा अभाव आहे, त्यामुळे अनेकदा वाहतूकदार या रस्त्याचा वापर करत नाही. या भागातील वाहतूक अधिक सुरळीत व्हावी यासाठी, वाहतूक कोंडीची समस्या कायमची दूर करावी अशी मागणी नागरिकांकडून महापालिकेला केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >