Monday, October 19, 2026

मुंबईत मंत्रालयाजवळ बेस्ट बस आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

मुंबईतून एक मोठी आणि खळबळजनक अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मंत्रालयाजवळ वाय. बी. सेंटर परिसरात एका स्कॉर्पिओ कारने बेस्टच्या बसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही. ही घटना १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजून २२ मिनिटांच्या सुमारास घडली. मंत्रालयाजवळील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वाय. बी. सेंटर (Y.B. Centre) परिसरात स्कॉर्पिओ कार (MH 26 BH 9211) आणि बेस्ट बस (MH 01 DR 1326) यांच्यामध्ये हा अपघात झाला.

धडक इतकी भीषण होती की, स्कॉर्पिओ कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून कारचे एक चाक निखळून पडले. दुसरीकडे, बेस्ट बसचेही मोठे नुकसान झाले. बसचा 'नकल आर्म' (knuckle arm) तुटला, चालकाच्या बाजूची विंडस्क्रीन फुटली आणि बसच्या बॉडीचेही नुकसान झाले. दोन्ही वाहनांची झालेली दुरवस्था पाहता अपघाताची तीव्रता किती प्रचंड होती, याची कल्पना येते. अपघातानंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रवाशाला किंवा चालकाला गंभीर दुखापत झालेली नाही, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

अपघातग्रस्त बेस्ट बस रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास ही बस टो (tow) करून तपासणीसाठी बीबीडी (BBD) आगारात नेण्यात आली. या प्रकरणी स्कॉर्पिओ चालकाविरोधात कुलाबा येथील कफ परेड पोलीस ठाण्यात १८ ऑक्टोबर २०२६ रोजी कायदेशीर नोंद करण्यात आली आहे. पोलीस सध्या या अपघातामागचे नेमके कारण काय होते, स्कॉर्पिओ चालकाचा वेग किती होता आणि तांत्रिक बिघाड किंवा मानवी चुकीमुळे हा अपघात झाला का, या सर्व बाबींचा कसून शोध घेत आहेत. मुंबईसारख्या उच्च सुरक्षा आणि वर्दळीच्या भागात घडलेल्या या घटनेमुळे वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा एररणीवर आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >