
यवतमाळ : यवतमाळ शहरातील पिंपळगाव बायपासवर भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दुचाकीवरून शाळेत जाणाऱ्या शिक्षिका गंभीर जखमी झाल्या आहेत. धडकेनंतर कारने दुचाकी काही मीटरपर्यंत फरफटत नेली. हा संपूर्ण घटनाक्रम रस्त्यालगतच्या एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शाळेत जात असताना अपघात; शिक्षिका गंभीर जखमी
निशा त्रिलोक फुंदे (वय ३८, रा. तिरुपती सोसायटी, पिंपळगाव) असे अपघातात जखमी झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. त्या यवतमाळ येथील जाजू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कार्यरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे निशा फुंदे या दुचाकीने शाळेत जात होत्या. याच वेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारने दुचाकीला काही मीटरपर्यंत फरफटत नेले. या अपघातात निशा फुंदे गंभीर जखमी झाल्या. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यवतमाळमध्ये भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक, घटना CCTV मध्ये कैद . . #yavatmal #yavatmalaccident #prahaarnewsline #marathinews #accident https://t.co/3bs8rVpzpA
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) October 19, 2026
अपघाताचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद
पिंपळगाव बायपासवरील या अपघाताचा घटनाक्रम रस्त्यालगतच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कार आणि दुचाकी यांच्यात झालेली धडक तसेच दुचाकी फरफटत गेल्याची घटना या दृश्यांमधून समोर आली आहे. या घटनेमुळे बायपासवरील वाहतूक सुरक्षा आणि वाहनचालकांच्या निष्काळजीपणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कारचालकाविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल
या अपघाताप्रकरणी दिगंबर पुंडलिकराव फुंदे (रा. गाडगेनगर, यवतमाळ) यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी डॉ. किशोर टोंगे (वय ४५, रा. जय विजय चौक, यवतमाळ) यांच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार नीलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गंभीर जखमी झालेल्या शिक्षिकेच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.





